जगातील प्रामाणिक शहरांच्या यादीत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर असल्याची बातमी आली आणि सर्वच मुंबईकर आनंदाने सुखावले. रस्त्यात पडलेले पैशांचे पाकीट असो किंवा रिक्षात विसरलेले महत्त्वाचे सामान असो, तुम्ही मुंबईत असाल, तर ते तुम्हाला परत मिळण्याची शक्यता जास्त असते. मात्र हरवलेली वस्तू परत मिळवून देण्यात मुंबईत ‘बेस्ट’ उपक्रमाचा वाटा सर्वात जास्त असल्याचे लक्षात येते. गेल्या आर्थिक वर्षांतच बेस्टमध्ये ११,९०८ गहाळ वस्तू सापडल्या. त्यापैकी २२९२ वस्तूंच्या मालकांनी आपापल्या वस्तूंचा ताबा घेतला, तर उर्वरित वस्तू बेस्टच्या गोदामात जमा करण्यात आल्या.
सार्वजनिक उपक्रमाच्या वाहनात वस्तू हरवली तर ती मिळण्याची शाश्वती नसते. मात्र बेस्ट बसमध्ये एखादा प्रवासी एखादी वस्तू विसरला, तर त्याला वेगळा अनुभव येतो. मुंबईत बसगाडय़ांमध्ये वर्षांला सरासरी १० हजारांहून अधिक गोष्टी हरवतात. मात्र या सगळ्याच गोष्टी बेस्टच्या गहाळ वस्तू विभागात जमा केल्या जातात. विशेष म्हणजे दोन ते तीन हजार प्रवासी दरवर्षी आपापल्या वस्तू घेऊनही जातात.
हरवलेल्या वस्तूची कहाणी
बसगाडीत किंवा आवारात एखादी वस्तू हरवली की, ती बसवाहक त्या चौकीमधील प्रवर्तकाकडे जमा करतात. ही वस्तू गहाळ वस्तू विभागात जमा करण्याआधी हरवलेल्या बस आगारात असेपर्यंत दावेदाराने तेथील अधिकाऱ्यांची भेट घेऊन खात्री पटवल्यास त्याला नोंदणी शुल्क देऊन ती वस्तू परत केली जाते. साधारण तिसऱ्या दिवशी ही वस्तू वडाळा आगारातील गहाळ वस्तू कार्यालयात जाते. ही वस्तू गहाळ वस्तू कार्यालयात आल्यानंतर तिची नोंद नोंदवहीत केली जाते. या वस्तूबरोबर संबंधित व्यक्तीचा पत्ता किंवा दुरध्वनी क्रमांक मिळाल्यास त्या व्यक्तीला संपर्क केला जातो. संबंधित प्रवासी विभागात आल्यानंतर वस्तूची ओळख पटवून खात्री झाल्यानंतर ती वस्तू त्याला परत केली जाते. त्यापूर्वी त्यांना विभागातील नोंदवहीत आपले नाव, पत्ता, वस्तूचे वर्णन, वस्तू हरवल्याची तारीख, बसमार्ग क्रमांक, प्रवासाची वेळ या गोष्टी नमूद कराव्या लागतात. मौल्यवान वस्तू परत देताना दावेदाराकडून ओळखपत्राचा पुरावा, पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवल्याची प्रत आदी पुरावे घेतले जातात.
सहसा हरवणाऱ्या वस्तू
दागिने, घडय़ाळे, मोबाइल फोन, रेडिओ, वॉकमन, कॅल्क्युलेटर्स, कॅमेरा, चष्मे, गॉगल, छत्र्या, डबे, पैशांचे पाकीट.
दावा न केलेल्या वस्तू
हरवलेल्या वस्तूंमध्ये नाशवंत स्वरूपाचा माल उदा. भाजीपाला, अन्नपदार्थ असल्यास त्या त्या आगारात आगार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लिलाव केला जातो. नाशवंत स्वरूपाचा अन्य माल म्हणजे साखर, चहा पावडर, तेल आदी वस्तू गहाळ वस्तू विभागात जमा केल्या जातात. त्यानंतर दहा दिवसांत कोणीही या वस्तूंवर दावा न केल्यास त्या वस्तूंचा लिलाव केला जातो. गहाळ वस्तू विभागात जमा झालेले मौल्यवान दागिने दावेदाराने दावा न केल्यास एक महिन्यानंतर अधीक्षक, कोष विभाग यांच्याकडे जमा करण्यात येतात.
पैसे
वर्ष                          मिळाले           दावा केलेले      दावा न केलेले
एप्रिल २००९-मार्च २०१०       ९, २५, ९०२       ६, ०८, ४७५       ३, १७, ४२७
एप्रिल २०१०-मार्च २०११       १०, ८२, ३११     ४, ०५, ६१६       ६, ७६, ६९४
एप्रिल २०११-मार्च २०१२       १०, २५, ६२३     ३, ६६, ६२२       ६, ५९, ०००
एप्रिल २०१२-मार्च २०१३       १५, ८१, ०४       ७, ५५, २९८       ८, २५, ५२९

Story img Loader