पालिकेने मदतीचा हात आखडता घेतल्यानंतर डळमळीत झालेला आर्थिक डोलारा सावरण्यासाठी बेस्टने केलेल्या बस भाडेवाढीमुळे प्रतिदिन उत्पन्नात २२ लाख रुपयांची वाढ झाली आहे. मात्र दररोज बेस्टच्या बसमधून दोन-तीन टप्प्यांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अन्य पर्याय निवडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येमध्ये प्रतिदिन ४० हजारांनी घट झाली आहे. उत्पन्न वाढले असले तरी प्रवासी पाठ फिरवू लागल्याने भाडेवाढ अंगाशी येण्याची भीती बेस्ट अधिकाऱ्यांना वाटू लागली आहे.
दर दिवशी तब्बल ४० लाख प्रवाशांना इच्छितस्थळी सोडणाऱ्या बेस्टचा तोटा दिवसेंदिवस वाढतच आहे. एकीकडे राज्य सरकार आणि पालिकेकडून आर्थिक मदतीसाठी केली जाणारी चालढकल, तर दुसरीकडे वाढत जाणारा तोटा यामुळे बेस्टला घरघर लागण्याची वेळ आली आहे. त्यामुळे बेस्टला बस भाडेवाढ करीत थेट मुंबईकरांच्या खिशात हात घालावा लागला. बस भाडेवाढ करताना बेस्टने प्रवासाच्या टप्प्यांमध्येही वाढ केली. पूर्वीचा पहिला दोन किलोमीटरचा टप्पा कायम ठेवून पुढील दोन टप्प्यांमध्ये एक किलोमीटरने, तर चौथ्या सात किलोमीटरच्या टप्प्यात थेट तीन किलोमीटरने वाढ केली. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी प्रवाशांना अनुक्रमे १० आणि १३ रुपये मोजावे लागत आहेत. रेल्वे स्थानकांपासून साधारण चार ते सहा किलोमीटरच्या अंतरासाठी अनेक विभागांमध्ये शेअर टॅक्सी आणि रिक्षा उपलब्ध असून त्यांचे दर आठ ते दहा रुपयांपर्यंत आहेत. परिणामी, आता प्रवाशांनी शेअर टॅक्सी-रिक्षाचा पर्याय निवडायला सुरुवात केली आहे. थांब्यावर बसची वाट पाहत रेंगाळण्यापेक्षा झटकन मिळणारी शेअर टॅक्सी किंवा रिक्षा पकडून प्रवासी इच्छित स्थळ गाठू लागले आहेत. त्यामुळे दोन-तीन रुपयांची बचतही होत आहे आणि प्रवासासाठी खोळंबाही होत नाही. परिणामी, बेस्टच्या प्रवासी संख्येमध्ये प्रतिदिन ४० हजारांनी घट झाली आहे.
दरदिवशी प्रवाशांकडून बेस्टला सुमारे ३.५ कोटी ते ४ कोटी रुपये उत्पन्न मिळते. १ फेब्रुवारीपासून केलेल्या भाडेवाढीमुळे प्रवाशांच्या संख्येत घट झाली असली तरी बेस्टच्या तिजोरीत प्रतिदिन अतिरिक्त २२ लाख रुपये जमा झाले आहेत. एकीकडे उत्पन्न वाढत असताना दुसरीकडे प्रवाशांची संख्या घटू लागली आहे. प्रवाशांची संख्या अशीच कमी होत राहिली तर बेस्टला नव्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे बेस्टचे अधिकारी हैराण झाले आहेत.
दिवसेंदिवस बेस्टचा तोटा वाढत असल्याने मुंबई महापालिकेने आर्थिक मदत करावी, अशी विनवणी अनेक वेळा बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आली. पालिकेने १५० कोटी रुपये बेस्टला दिले असते तर भाडेवाढ करून थेट प्रवाशांच्या खिशात हात घालण्याची वेळ आली नसती, असे बेस्टमधील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तब्बल ३३,५१४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पालिकेला आपलाच एक उपक्रम सावरण्यासाठी १५० कोटी देता आले नाहीत, हे प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना-भाजपचे अपयश असल्याची टीका मुंबईकर करू लागले आहेत.
प्रसाद रावकर, मुंबई

Story img Loader