० मढ जेट्टी व चित्रनगरीपासून रात्रीची बस
० भारतीय चित्रपट सेनेचे निवेदन
गोरेगावची चित्रनगरी किंवा मढ आयलंड येथे मालिकांचे चित्रिकरण रात्री अपरात्री संपल्यानंतर किमान जवळच्या रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठीही कोणतीच सोय नसलेल्या बॅकस्टेज कलाकारांठी आता लवकरच बेस्टची सेवा सुरू होणार आहे. मढ जेट्टी आणि गोरेगाव चित्रनगरी येथून दोन बसगाडय़ा किमान दादपर्यंत सोडाव्यात अशा मागणीचे पत्र भारतीय चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष सुबोध भावे यांनी बेस्ट समितीचे अध्यक्ष सुनील (नाना) आंबोले यांना गुरुवारी दिले. या बाबत लवकरच निर्णय घेऊन अशा प्रकारची बससेवा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन आंबोले यांनी दिल्याचे सुबोध भावे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
चित्रनगरी किंवा मढ येथे दुपारी दोन ते रात्री दोन या शिफ्टचे काम संपल्यानंतर बडे कलाकार व दिग्दर्शक वगैरे मंडळी आपल्या गाडय़ांनी घरी पोहोचतात. मात्र सर्व काम संपेपर्यंत सेटवर थांबणाऱ्या स्पॉटबॉय, लाइटमन अशा बॅकस्टेज कलाकारांना पहिल्या बसची वाट बघत थांबावे लागते. ही दोन्ही ठिकाणे रात्री निर्मनुष्य असतात. तसेच तेथे इतर कोणतीही सोय नाही. त्यामुळे या कलाकारांना किमान जवळच्या रेल्वे स्थानकापर्यंत जायला मिळावे, यासाठी बेस्टने एक गाडी रात्री अडीचच्या दरम्यान सोडावी, अशी मागणी ‘भाचिसे’ने या पत्राद्वारे केली आहे.