वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर हा मुंबईकरांसाठीचा अत्यंत त्रासदायक प्रवास सुखद करणाऱ्या मेट्रोच्या आगमनानंतर या भागातील बेस्टच्या बसगाडय़ा ओस पडायला लागल्या आहेत. यावर तोडगा म्हणून बेस्टने मेट्रोच्या स्थानकांना जोडणी देणाऱ्या आणि इतर भागांमध्ये जाणाऱ्या ‘मेट्रो फेरी’ बसगाडय़ा सुरू केल्या होत्या. मात्र प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे ही सेवा १ नोव्हेंबरपासून बंद करण्याची वेळ बेस्ट प्रशासनावर आली आहे. मात्र ही सेवा बंद केल्यानंतर मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी बेस्टच्या वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांसह मेट्रोला पूरक असे इतर कोणते मार्ग सुरू करता येतील का, याची चाचपणी करण्यासाठी बैठक घेतली आहे.
मुंबईमधील पहिलीवहिली मेट्रो सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच अंधेरी ते घाटकोपर आणि अंधेरी ते वर्सोवा या मार्गावरील बेस्टच्या प्रवाशांमध्ये लक्षणीय घट दिसली होती. हे घसरलेले प्रवासी भारमान वाढवण्यासाठी बेस्ट प्रशासनाने तातडीने मेट्रोच्या मार्गावर पाहणी करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांचे पथक पाठवले होते. या पथकाच्या पाहणीनंतर जूनपासून बेस्टने मेट्रोच्या विविध स्थानकांवर उतरणारी प्रवासी संख्या लक्षात घेत ‘मेट्रो फेरी-१’ आणि ‘मेट्रो फेरी-२’ दोन जोडमार्ग सुरू केले होते.
मेट्रो फेरी-१ हा मार्ग सीप्झ ते सीप्झ (मार्गे चकाला, विमानतळ रस्ता) असा जात होता. तर मेट्रो फेरी-२ ही बस आझाद नगर ते मरोळ या मार्गाने जात होती. या दोन्ही मार्गावर बेस्टतर्फे दर दिवशी एकूण ७० फेऱ्या धावत होत्या. मात्र या मेट्रो फेरीला मिळणारा प्रतिसाद अत्यल्प होता. दर दिवशी होणाऱ्या या फेऱ्यांमध्ये सरासरी २० ते २१ प्रवासीच प्रवास करत होते. त्यामुळे या फेऱ्यांमुळे बेस्ट प्रशासनाला तोटा होत होता.
अखेर बेस्टने या फेऱ्या १ नोव्हेंबरपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे याआधी बेस्टने टर्मिनल-२साठई बेलापूर, ठाणे आणि बोरिवली येथून सुरू केलेल्या वातानुकुलित बसगाडय़ाही अपुऱ्या प्रतिसादामुळे बंद केल्या होत्या. मात्र या गाडय़ा बंद झाल्यानंतर मेट्रो अधिकाऱ्यांनी बेस्टच्या परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान बेस्टने पुन्हा एकदा मेट्रो स्थानकांना जोडणी देणाऱ्या बसगाडय़ा सुरू कराव्या, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बेस्ट आणि मेट्रो या दोन्हीच्या तिकिटांसाठी एकच कार्ड सुरू करता येईल का, याबाबतही विचारविनिमय होणार आहे. या कार्डाद्वारे बेस्टच्या कोणत्याही मार्गावरील तिकीट काढणे शक्य होईल.
बेस्टच्या परिवहन विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या मते तिकीट काढण्यासाठी एकच कार्ड सुरू करण्याव्यतिरिक्त बेस्ट पुन्हा मेट्रोला जोडणी देणाऱ्या सेवा सुरू करण्यास इच्छुक नाही. जूनपासून आम्ही सर्वच बाबी ध्यानात घेऊन या मार्गामध्ये वेळोवेळी बदल केले. मात्र तरीही हे मार्ग फायदेशीर ठरलेले नाहीत. आमच्या गाडय़ांनी पाच किलोमीटर अंतर दहा मिनिटांत कापावे, अशी मेट्रो अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र मुंबईतील आणि विशेषत: मेट्रोच्या भागातील वाहतूक कोंडी लक्षात घेता ते शक्य नाही, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
बेस्टची मेट्रो फेरी प्रतिसादाअभावी बंद
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर हा मुंबईकरांसाठीचा अत्यंत त्रासदायक प्रवास सुखद करणाऱ्या मेट्रोच्या आगमनानंतर या भागातील बेस्टच्या बसगाडय़ा ओस पडायला लागल्या आहेत. यावर तोडगा म्हणून बेस्टने मेट्रोच्या स्थानकांना जोडणी देणाऱ्या आणि इतर भागांमध्ये जाणाऱ्या ‘मेट्रो फेरी’ बसगाडय़ा सुरू केल्या होत्या.
First published on: 04-11-2014 at 06:48 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best stop metro ferry service in mumbai