एखाद्या श्रीमंताघरच्या मुलीच्या कलेचे बेफाट कौतुक व्हावे आणि गरिबाघरच्या मुलीच्या अंगच्या कलेची उपेक्षा व्हावी, असा काहीसा प्रकार ‘बेस्ट’ उपक्रमाने सध्या मुंबईत चालवला आहे. रिलायन्सच्या मुंबई मेट्रोवनवर बेस्टने बुधवारपासून दोन जोडमार्ग चालू केले आहेत. मात्र राज्य सरकार चालवत असलेली आणि तुलनेने कमी यशस्वी ठरलेली मोनोरेल सुरू होऊन पाच महिने उलटत आले, तरी अद्याप मोनोरेलच्या वडाळा डेपो या अत्यंत अडनिडय़ा स्थानकापासून बेस्टने कोणताही जोडमार्ग सुरू केलेला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या बेस्टने रिलायन्स मेट्रोला झुकते माप देत राज्य सरकारच्या मोनोरेलकडे साफ दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.
मेट्रो सुरू झाल्यानंतर महिन्याच्या आतच मेट्रोच्या प्रवाशांची संख्या प्रतिदिन चार लाखांपर्यंत पोहोचली. यामुळे बेस्टच्या घाटकोपर ते अंधेरीदरम्यानच्या अनेक मार्गाच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला. त्यानंतर बेस्टने तातडीने या मार्गावर जोडमार्गासाठी सर्वेक्षण सुरू केले आणि बुधवारपासून मेट्रो फेरी १ आणि मेट्रो फेरी २ असे मार्गही सुरू केले. मात्र हीच आस्था मोनोरेलच्या बाबतीत दाखवण्यात आली नाही.
चेंबूर ते वडाळा डेपो (आणिक आगार किंवा प्रतीक्षा नगर) या दरम्यान धावणाऱ्या मोनोरेलवर पहिले दोन महिने प्रवाशांची गर्दी होती. मात्र वडाळा डेपो येथे मोनोरेल पोहोचल्यानंतर मोनोच्या स्टेशनखालून इतरत्र जाण्यासाठी बेस्टचा एकही मार्ग नसल्याचे आढळले. बेस्टची बस गाठण्यासाठी दीड किलोमीटरची पायपीट करण्याशिवाय गत्यंतर नसल्याने आधीच अल्प प्रतिसाद असलेल्या मोनोकडे प्रवाशांनी पाठ फिरवली.
* जोडमार्ग कसा देता येईल?
मोनोरेलपासून जवळच असलेल्या आणिक आगारापर्यंत बेस्टची ६० क्रमांकाची बस कुर्ला स्थानक पूर्वेकडून येते. या बसमधील बहुतांश प्रवासी बेस्ट कर्मचारीच असतात. ही बस मोनोच्या वडाळा डेपो स्थानकापर्यंत घेणे शक्य होते. मात्र बेस्टने व्यवसाय वाढवण्याची आणि त्याद्वारे राज्य सरकारच्या मोनोलाही संजीवनी देण्याची संधी अद्याप तरी साधलेली नाही. याबाबत बेस्टकडे प्रस्ताव आला असून त्या प्रस्तावावर विचार चालू असल्याचे बेस्ट प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
* सर्वेक्षणानंतरच नवीन मार्ग
कोणताही जोडमार्ग सुरू करताना त्या मार्गावरील प्रवाशांची संख्या, अंतर, मोनो किंवा मेट्रो किंवा रेल्वेची वारंवारता यांचा विचार केला जातो. मोनोरेलला मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद अत्यल्प आहे. सुरुवातीला ‘जॉय राइड’ म्हणून प्रवाशांनी गर्दी केली असली, तरी त्यानंतर त्याचा फार उपयोग प्रवाशांना झालेला नाही. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने हा नवा मार्ग सुरू केला नाही. – सुनील गणाचार्य, सदस्य (बेस्ट समिती)
* पाठपुरावा करणार
मोनोरेलची प्रवासी संख्या कमी असली, तरी या माध्यमातून बेस्टला नव्या उत्पन्नाची संधी उपलब्ध होऊ शकते. या प्रवाशांना सेवा मिळाल्यास राज्य सरकारचा उपक्रम असलेल्या मोनोरेललाही त्याचा फायदा होईल. प्रवाशांना इतर वाहतुकीच्या साधनांसाठी दीड किलोमीटरची पायपीट करावी लागत असेल, तर बेस्टने या मार्गाचा विचार गांभीर्याने करायला हरकत नाही. बेस्टने मोनोरेलच्या वडाळा डेपो स्थानकासाठीही जोडमार्ग सुरू करावा, यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. – शिवजी सिंह, सदस्य (बेस्ट समिती)
* मेट्रोचे जोडमार्ग कसे?
दरम्यान, बुधवारपासून बेस्टने अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम या दोन्ही भागांत मेट्रोसाठी जोडमार्ग सुरू केले. या जोडमार्गामुळे मरोळ, आझाद नगर या दोन मेट्रोच्या स्थानकांवर उतरणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
* मेट्रो फेरी १
सिप्झ बसस्थानक-क्रांतीवीर लहुजी साळवे मार्ग-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक-बी छेद मार्ग-मथुरादास वसनजी मार्ग-रमाबाई आंबेडकर चौक (मरोळ नाका)-मरोळ अग्निशमन केंद्र मार्ग-मरोळ मरोशी मार्ग-मरोळ मरोशी बसस्थानक-विजयनगर उड्डाणपूल-सी छेद मार्ग-क्रांतीवीर लहुजी साळवे मार्ग-सिप्झ बसस्थानक
* मेट्रो फेरी २
ओशिवरा आगार-लिंक रोड-बेहराम बाग-कमलाकरपंत वालावालकर मार्ग-आदर्शनगर-ए. बी. तारापोरवाला चौक-ओशिवरा आगार
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा