युनिसेफ, युनेस्कोकडून कौतुकाची थाप
विद्यार्थ्यांच्या ‘डोकॅलिटी’ला आवाहन करणाऱ्या आणि आव्हानही देणाऱ्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी) ‘टेकफेस्ट’ या बहुचर्चित तंत्र व विज्ञानविषयक महोत्सवाच्या शिरपेचात यंदा आणखी एक मानाचा शिरपेच खोवला गेला आहे. युनिसेफ व युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थांनी टेकफेस्टला आपले ‘पॅट्रोनेज’ देऊ केले असून त्यामुळे यापुढे टेकफेस्टला आपल्या सर्व कार्यक्रमात या दोन संस्थांचा लोगो आणि नावाचा वापर करता येणार आहे. या आंतरराष्ट्रीय संस्थांकडून असा मान मिळालेला हा भारतातला पहिलाच महाविद्यालयीन महोत्सव आहे.
आयआयटीच्या पवई परिसरात यंदा ३ ते ५ जानेवारी, २०१४ दरम्यान टेकफेस्ट रंगणार आहे. टेकफेस्टमध्ये विज्ञान-तंत्रज्ञानातून मनोरंजन साधण्याबरोबरच पर्यावरण संवर्धन, सामजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीनेही तरूणांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्याची दखल घेत युनिसेफ आणि युनेस्कोने टेकफेस्टला हा मान देऊ केला आहे.
त्यामुळे, टेकफेस्टला आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यक्रमांचे आयोजन करताना मदत होणार आहे, अशी प्रतिक्रिया टेकफेस्टच्या प्रसिद्धीची जबाबदारी सांभाळणाऱ्या दिव्यम बन्सल या विद्यार्थ्यांने दिली.
टेकफेस्टचे हे यंदाचे १८वे वर्ष आहे. टेकफेस्ट हा आशिया खंडातील सर्वाधिक मोठा तंत्रज्ञान व विज्ञान विषयक महोत्सव ओळखला जातो. आपल्या लौकिकाला साजेशा अशा स्पर्धा आणि कार्यक्रम यंदाही टेकफेस्टमध्ये असणार आहेत. त्यासाठी हजारो ते लाखो रुपयांच्या बक्षीसांची उधळण यंदाच्या टेकफेस्टमध्ये असणार आहे.
रोबोवॉर बरोबरच कॅसिओपियन वॉर ही देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आव्हान देणारी स्पर्धा यंदाच्या टेकफेस्टचे आकर्षण असेल. या स्पर्धा भुवनेश्वर, मुंबई, हैदराबाद, इंदूर आणि नोएडा या चार विभागांमध्ये होणार आहे. रोबोवॉरची ‘काठीण्य’ पातळीही यंदा वाढविण्यात आली आहे. यात नेपाळ, थायलंड, रशिया, इजिप्त आदी ११ निरनिराळ्या देशातून विद्यार्थी सहभागी होतील.
‘आयडेट’ या शीर्षकाखाली तीन प्रमुख योजना, प्रकृती आणि उन्नत या तीन स्पर्धा सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देणाऱ्या असतील. उत्तरांचलमधील नैसर्गिक आपतीची दखल टेकफेस्टने योजना या स्पर्धेच्या निमित्ताने घेतली आहे. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत परिस्थिती कशी हाताळायची याची योजना आखण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर असणार आहे. यासाठी ७५ हजार रुपयांची पारितोषिके असणार आहे.
इतरांच्या सेवेमध्ये स्वत:ची ओळख शोधा, या महात्मा गांधीच्या संदेशाला अनुसरून टेकफेस्टमध्ये अपंगांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने तरूणाईला विचारप्रवण केले जाणार आहे. तंत्रज्ञान अपंगांचे आयुष्य अधिक सुकर करू शकेल का, करेल तर कसे, याचा विचार या स्पर्धेमध्ये केला जाणार आहे. या शिवाय प्रकृती या स्पर्धेतून पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने स्पर्धकांनी कल्पक योजना सुचवायच्या आहेत.
या व्यतिरिक्त मान्यवरांची भाषणे, चर्चासत्रे, व्याख्याने, कार्यशाळा, प्रदर्शने आदींची रेलचेल टेकफेस्टमध्ये असेलच. टेकफेस्ट संदर्भात
६६६.३ीूँऋी२३.१ॠ या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अधिक माहिती मिळेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा