लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन पाच दिवसांचा कालावधी उलटला असला, तरी राजकीय पक्षांना मात्र त्यातून काही सवलत मिळाली की काय, अशी शंका प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यालयांसमोर झळकणाऱ्या फलकांनी मतदारांच्या मनात निर्माण झाली आहे. विविध राजकीय पक्षांच्या मुख्य कार्यालयाबाहेर उभारलेले फलक म्हणजे आचारसंहितेचा भंग नव्हे काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. जिल्हा निवडणूक शाखेने पक्षांच्या खासगी कार्यालयावर असे फलक उभारण्यास कोणताही अडसर नसल्याचे म्हटले आहे. परंतु, ते अधिकृत आहेत की अनधिकृत यावर नजर ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याचे सांगितले आहे.
मागील आठवडय़ात बुधवारी सकाळी लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची चहलपहल सुरू झाली असून, सार्वजनिक जागेवरील राजकीय पक्षांचे फलक काढले वा झाकून ठेवले जात असताना, कार्यालयांबाहेर झळकणाऱ्या फलकांविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. एरवी कोणाचा वाढदिवस, कोणाची नियुक्ती अथवा कोणाचे स्वागत करण्यासाठी संबंधितांकडून ठिकठिकाणी उभारल्या गेलेल्या फलकांपासून आचारसंहिता लागू झाल्यावर शहराची मुक्तता होऊ लागली. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून उभारल्या जाणाऱ्या फलकांमुळे शहराचे विद्रूपीकरण तर झाले, शिवाय वाहतुकीला अनेकदा अडथळा निर्माण होतो. आजवर हे फलक काढण्यात कानकुज करणारी महापालिकेची यंत्रणा आचारसंहिता लागू होताच खडबडून जागी झाली.
शहरातील सर्व भागातील राजकीय पक्षांशी संबंधित फलक, झेंडे हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले. मागील चार दिवसांत जवळपास एक हजारहून अधिक फलक, बॅनर व झेंडे असे साहित्य महापालिकेने जप्त केले आहे. इतकेच नव्हे तर, खासदार वा आमदार निधीतून साकारलेल्या विकासकामांवरील संबंधितांचा उल्लेख झाकून ठेवण्याची प्रक्रिया सुरू आहे. शहरात आमदार वा खासदार निधीतून अनेक बसथांबे तयार करण्यात आले. त्यावर संबंधित लोकप्रतिनिधीचे नावही झळकत असते. या ठिकाणी पांढरा रंग मारून आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.
या परिस्थितीत पक्ष कार्यालयांबाहेर झळकणाऱ्या फलकांकडे यंत्रणेचे लक्ष गेले की नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. शालिमार येथील शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय, एन. डी. पटेल रस्त्यावरील भाजपचे कार्यालय, ठक्कर बाजार येथील मनसे, महात्मा गांधी रस्त्यावरील काँग्रेस आणि मुंबई नाका परिसरातील राष्ट्रवादी भवन या प्रमुख पक्ष कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर फलक दिमाखात उभे असल्याने हा संभ्रम वाढला आहे. पक्षांच्या खासगी कार्यालयात असे फलक उभारण्यास कोणताही अडसर नसल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले. या फलकांसाठी संबंधितांनी परवानगी घेतली की नाही, त्यामुळे कोणाला काही अडसर होतो का, याची छाननी करण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘त्या’ फलकांविषयी संभ्रम
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन पाच दिवसांचा कालावधी उलटला असला,
First published on: 11-03-2014 at 07:48 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bewilderment about that banners