नागरीकरणामुळे शहरांचा होणारा विस्तार, नवी मुंबईत होत असलेली विमानतळाची उभारणी आणि प्रस्तावित नेवाळी विमानतळाचा विचार करता नवी मुंबई, तळोजा, कल्याण, उल्हासनगर ते मुरबाडपर्यंत मेट्रो रेल्वे ही काळाची गरज आहे. या भागातील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी मेट्रो रेल्वेचा प्राधान्याने विचार झाला पाहिजे, अशी मते जागरूक रेल्वे प्रवासी परिषदेत रविवारी व्यक्त करण्यात आली.
तळोजापुढील कल्याण, उल्हासनगर, मुरबाडपर्यंतची हद्द महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीत येते. तळोजा ते मुरबाडपर्यंत मेट्रो रेल्वे मार्गासाठी ‘एमएमआरडीए’ने आपली जमीन सिडकोकडे हस्तांतरित केली तर या प्रकल्पाचा लवकर विकास करणे शक्य होईल, असे यावेळी सांगण्यात आले.
कल्याणमधील अत्रे रंगमंदिरात रेल्वे परिषदेचे सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी आयोजन केले होते. यावेळी कल्याण-नगर रेल्वे, तळोजा ते मुरबाड मेट्रो रेल्वे या विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर ठाणे, पनवेल, कल्याण डोंबिवली या लगतच्या शहरांजवळील रस्ते वाहतुकीवर त्याचा मोठा ताण येणार आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विमानतळ उभारणीच्या कामाला सुरुवात होण्यापूर्वीच रस्ते वाहतुकीला पर्याय म्हणून मेट्रो, मोनो रेलचा ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या भागांत प्राधान्याने विचार झाला पाहिजे, अशी मते उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
तळोजा ते कल्याण-मुरबाडपर्यंत मेट्रो रेल्वेचा विस्तार झाला तर परिसरातील शहर तसेच ७० गावांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. कल्याण-नगर रेल्वे मार्गासाठी गेले दहा वर्ष पाठपुरावा करूनही रेल्वे बोर्ड या प्रकल्पासाठी सहकार्य करीत नाही. या प्रकल्पामुळे नगर मुंबईच्या अधिक जवळ येईल. ताजा भाजीमाल कल्याण, मुंबईत उपलब्ध होईल. बाजारपेठांचा विकास होऊन स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे यावेळी वक्त्यांनी सांगितले. २००९ मध्ये रेल्वे परिषद कल्याणमध्ये घेण्यात आली होती.

Story img Loader