यंदाचा भाई माधवराव बागल पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांना जाहीर करण्यात आला आहे. गौरवपत्र, स्मृतिचिन्ह, रोख पाच हजार रूपये अशा स्वरूपातील हा पुरस्कार आहे. परिवर्तनवादी नेते, क्रांतिकारक, समाजसुधारक व ज्येष्ठ स्वातंत्रसेनानी भाई माधवराव बागल यांच्या जयंतीदिनी मंगळवारी (२८ मे) शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्राचार्य डॉ.अशोक भोईटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती भाई माधवराव बागल विद्यापीठाचे अध्यक्ष बाबुराव धारवाडे, उपाध्यक्ष प्रा.रा.कृ.कणबरकर, कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.    
भाई माधवराव बागल यांची ११७ वी जयंती २८ मे रोजी आहे. यानिमित्त आयोजित केलेल्या उपक्रमांची माहिती या वेळी देण्यात आली. २७ मे रोजी सायंकाळी शाहू स्मारक भवन येथे ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांचे ‘भाई माधवराव बागल यांच्या विचारांची आजच्या संदर्भात प्रस्तुतता’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.   
२८ मे रोजी सकाळी शाहू मिल समोरील भाई माधवराव बागल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले जाणार आहे. तर सायंकाळी शाहू स्मारक भवन येथे पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे. हा पुरस्कार १९९२ पासून सुरू झाला आहे. आतापर्यंत तो संतराम पाटील, चित्रकार गणपतराव वडणगेकर, प्रा.एन.डी.पाटील, डॉ.नरेंद्र दाभोलकर, डॉ.गोविंद पानसरे, डॉ.यशवंत चव्हाण,दलित मित्र बापूसाहेब पाटील, पत्रकार कुमार केतकर, नागनाथअण्णा नायकवडी, सुशीलकुमार शिंदे,डॉ.भालचंद्र मुणगेकर, ज्ञानेश महाराव, निळू फुले, डॉ.आ.ह.साळुंखे, डॉ.सुनीलकुमार लवटे, शांताराम गरूड,व्यंकप्पा भोसले आदींना देण्यात आलेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा