शासन अन् प्रशासनासह सर्वच प्रकारच्या व्यवस्था भ्रष्ट होत, विस्कळल्या असताना, काटेकोर व स्वच्छ चारित्र्याने परखड जीवन जगणाऱ्या थोरामोठय़ांच्या ध्येयधोरणांचा अंगीकार करणे समाज हिताचे ठरणार आहे. या पाश्र्वभूमीवर भाई पंजाबराव चव्हाण यांचा माझ्यासारख्या सामान्य मित्राकडून होणारा घरचा सत्कार मी भाग्याचा मानतो. असे समाधान राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष बी. आर. पाटील यांनी व्यक्त केले.
डाव्या विचारसरणीचे खंदे नेते, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, कृषितज्ज्ञ भाई पंजाबराव चव्हाण यांच्या ८८व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करताना ते बोलत होते. अॅड. रवींद्र पवार अध्यक्षस्थानी होते. तर कृष्णा कारखान्याचे माजी संचालक संपतराव थोरात, कराड अर्बन बँकेचे माधव माने, रोटरी क्लब कराडचे अध्यक्ष प्रवीण परमार, रणजित शेवाळे, कृष्णा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किसनराव यादव उपस्थित होते. दरम्यान, ज्येष्ठ नेते भीमरावदादा पाटील, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश भोसले, माजी आमदार भास्करराव शिंदे, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी प्रत्यक्ष भेटून पंजाबराव चव्हाण यांचे अभीष्टचिंतन केले, तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मान्यवरांनी दूरध्वनीवरून त्यांना शुभेच्छा दिल्या.
बी. आर. पाटील म्हणाले, की पंजाबराव चव्हाण यांचे काका आनंदराव चव्हाण केंद्रात प्रतिष्ठेच्या पदावर मंत्री होते. काकी प्रेमलाताई याही धडाडीच्या महिला नेत्या म्हणून राष्ट्रीय पातळीवर नावलौकिकास असताना त्यांनी सत्तेवर नामी दबदबा ठेवला होता. आज त्यांचे धाकटे बंधू तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. परंतु, भाईंनी आपले जीवन शेकापच्याच विचाराने, तसेच अतिशय परखड व कणखर बाण्याने व्यथित केले आहे. अशी सुसंस्कृत व बाणेदार व्यक्तिमत्त्वे समाजात आज दिसून येत नाहीत. बोलतात एक आणि करतात भलतेच अशांची सध्या पर्वणी पाहावयास मिळत असताना भाईंसारखे सच्चे व्यक्तिमत्त्व निश्चितच समाजाला दिशा देणारे, एक विश्वास देणारे असल्याचा माझा दावा असल्याचे पाटील यांनी सांगितले.
माझे व भाईंच्या कुटुंबाचे गेल्या पाच दशकांचे ऋणानुबंध आहेत. भाईंचा शेती क्षेत्राबद्दल गाढा अभ्यास असल्याने त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही अपार कष्टाने प्रयोगशील शेती करताना, फायद्याच्या शेतीचा प्रचार आणि प्रसार केला. तरुणांनी शहरात जाऊन दुसऱ्याच्या दारात चाकरी करण्याखेरीज शेतीत कष्ट उपसून स्वत:च्या कुटुंबाबरोबरच ग्रामीण भागाचे जीवनमान बदलावे यासाठी भाईंनी सातत्याने प्रयत्न केले. शेतीवर निष्ठा ठेवताना अवघे आयुष्य डाव्या विचाराने व स्वच्छ चारित्र्याने जगले असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
अॅड. रवींद्र पवार म्हणाले, की तात्त्विक व वैचारिक भक्कम बैठक असणारे भाई शेकापचे ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्यसैनिक व शेतीतज्ज्ञ आहेत. अनेक बाका प्रसंगांवरही विचलित न होणाऱ्या पंजाबराव चव्हाण यांना श्रमजीवी व शेतकरी जनतेबद्दल जिव्हाळा आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असून, त्यांना वैचारिक भूमिका बदलण्यासाठी अनेक प्रलोभने दाखविण्यात आली, मात्र भाईंनी डाव्या विचाराचा मूळ पिंड कधी सोडण्याचा तिळमात्रही विचार केला नसल्याचा सार्थ अभिमान वाटतो.