लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संतश्रेष्ठ गोरोबाकाका यांच्या वार्षिक यात्रेस रविवारी भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. विविध ठिकाणांहून भगव्या पताका खांद्यावर घेऊन ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष करीत शनिवारपासूनच िदडय़ा तेरनगरीत दाखल झाल्या. हरिनामाच्या गजराने तेरनगरी दुमदुमून गेली.
तेर येथे श्रीसंत गोरोबाकाका यांच्या वार्षिक यात्रेनिमित्त राज्याच्या विविध भागांतून दिडय़ांचे आगमन झाले. रविवारी पहाटे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते महापूजा झाली. दत्तात्रय मुळे, बाळासाहेब वाघ, अॅड. बाळासाहेब पाटील, बाळकृष्ण लामतुरे, पद्माकर फंड, प्रशांत वाघ, सिद्राम सलगर, जयेश कदम, प्रज्योत रसाळ, भारत नाईकवाडी, वसंतराव नाईकवाडी, विठ्ठल लामतुरे, किसन शेळके, दीपक खरात, अजय फंड आदींसह भाविक भक्त मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
रविवारी एकादशीनिमित्त तेरमध्ये दाखल झालेल्या दिंडय़ांची नगर प्रदक्षिणा झाली. भाविक भक्त मिळेल त्या वाहनाने दर्शनासाठी येत आहेत. भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. प्रत्येक फडावर हरिपाठ, भजन, कीर्तन, प्रवचनासाठी भाविक भक्त गर्दी करीत आहेत. फिरत्या चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी बालगोपाळांसह मोठय़ांचीही झुंबड उडत आहे. यात्रेकरूंसाठी जादा बसेसची सोय केली असून, टँकरद्वारे यात्रेकरूंना पाणीपुरवठा केला जात आहे. एकादशीनिमित्त नगर प्रदक्षिणेच्या वेळी जागोजागी रस्त्यावर रांगोळय़ांची पखरण केली होती. अनेक ठिकाणी नागरिकांनी वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. श्रीसंत गोरोबाकाका मंदिरात दत्तात्रय मुळे यांच्या वतीने भावकांना फळवाटप करण्यात आले. याचा प्रारंभ खासदार डॉ. पाटील यांच्या हस्ते झाला. नवनाथ नाईकवाडी यांच्या वतीने साबुदाण्याची खिचडी, उसळ वाटप, तर माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ इंगळे यांच्या वतीने रसना पेय वाटप करण्यात आले. दीपक खरात यांच्या ‘वैराग्य महामेरू’ पुस्तकाचे प्रकाशन डॉ. पाटील यांच्या हस्ते झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा