डॉ. लाभसेटवार पुरस्काराने गौरव
कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे  देशभरातील अडीच लाख शेतक ऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नाउमेद शेतकऱ्यांना जगण्याचे बळ प्रा. इंद्रजित भालेराव यांची कविता देते ते माणुसकीचे गीत गाऊन जगणे सुलभ करतात. ग्रामीण जनतेचे दु:ख मांडणारे व त्यावर फुंकर घालणारे भालेराव हे प्रभावी कवी आहेत, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले.
नागपूर येथील डॉ. अनंत व लता लाभसेटवार प्रन्यास, तसेच अमेरिकेतील डॉ. लाभसेटवार प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा डॉ. लाभसेटवार साहित्य सन्मान पुरस्कार येथील प्रसिद्ध कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांना डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार लेखकाच्या गावी जाऊन प्रदान करण्यात येतो. चतुरंग प्रतिष्ठान व शारदा महाविद्यालयाच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी खासदार अ‍ॅड. गणेशराव दुधगावकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनंत लाभसेटवार, कादंबरीकार डॉ. राजन गवस, हमराज जैन, विलास पानखडे आदींची  उपस्थिती होती. नव्या जीवन संघर्षांत प्रतिष्ठा गमावलेल्या ग्रामीण माणसाला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे काम लेखक, कवी करीत असतात. दुष्काळजन्य स्थितीत कवितेतून भाकर देता आली नाही तरी धीर देता येतो हे काम भालेराव यांनी आपल्या कवितेतून केले आहे, असे उद्गार डॉ. कोत्तापल्ले यांनी काढले.
डॉ. अनंत लाभसेटवार यांनी पुरस्काराबाबत आपली भूमिका व्यक्त केली. भालेराव यांच्या काव्यप्रतिभेबद्दल डॉ. राजन गवस म्हणाले, की शेतकऱ्यांच्या दु:खाचे तपशीलवार दस्ताऐवज म्हणजेच भालेराव यांचे काव्य आहे. शेतकऱ्यांना व त्यांच्या मुलांना आत्मविश्वास देऊन त्यांच्या आतल्या आवाजाला साद घालणारी ताकद आहे. अध्यक्षीय समारोपात खासदार दुधगावकर म्हणाले, की माझ्या महाविद्यालयातील प्राध्यापकाचा सन्मान माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. समाजात सज्जन सक्रिय व्हावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ. अनंत लाभसेटवार लिखित ‘जपानचा सन्मान’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. या वेळी प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे, अनिल मेहता, डॉ. गुंडेवार, डॉ. निलेवाड यांचा सत्कार करण्यात आला. हेमराज जैन यांनी प्रास्ताविक केले. अजित मातेकर यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब जाधव यांनी आभार मानले.

Story img Loader