भंडारदरा धरणातून शेतीसाठी तीन आवर्तने देण्यात येणार असून, पहिल्या आवर्तनासाठी १५ डिसेंबरला भंडारद-यातून पाणी सोडण्याचा निर्णय आज झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या वेळी रब्बी व उन्हाळी हंगामातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले.
पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या अध्यक्षतेखाली भंडारदरा धरण कालवा सल्लागार समितीची बैठक राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यपीठाच्या विश्रामगृहात झाली. या वेळी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आ. भाऊसाहेब कांबळे, आ. शिवाजी कर्डिले, आ. डॉ. सुधीर तांबे तसेच समितीच्या सदस्यांसह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, माजी आमदार चंद्रशेखर कदम आदी उपस्थित होते.
भंडारदरा धरणात सध्या १० हजार ६६१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून गाळ व बाष्पीभवनाद्वारे १ हजार २०० दशलक्ष घनफूट पाणी खर्च होणार आहे, ९ हजार ४०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा धरणात शिल्लक राहणार आहे. भंडारदरा धरणातून शेती व पिण्यासाठी १५ डिसेंबरला पहिले आवर्तन सोडण्यात येणार आहे. २७ जानेवारीला अकोले व संगमनेरसाठी पिण्याच्या पाण्याचे मिनी आवर्तन, १९ फेब्रुवारी रोजी शेतीसाठी दुसरे आवर्तन, ३ एप्रिल रोजी अकोले व संगमनेरसाठी पिण्याच्या पाण्याचे मिनी आवर्तन, २६ एप्रिल रोजी शेतीचे तिसरे आवर्तन, ८ जून रोजी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन श्रीरामपूपर्यंत सोडण्यात येणार आहे. आवर्तनाच्या कालावधीत पाण्याची बचत झाल्यास धरणातून १ जुलै रोजी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याचे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले.
धरणाच्या लाभक्षेत्रात १२ हजार हेक्टर रब्बीचे तर उन्हाळी ८ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. निळवंडे धरणाचे काम करण्यासाठी या धरणातून जायकवाडीसाठी ५ टीएमसी पाणी सोडून देण्यात आल्याने धरणात केवळ ५०० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असून, यातून २५० दशलक्ष घनफूट पाणी अकोले व संगमनेर शहरासाठी सोमवारपासून सोडण्यात येणार असल्याची माहिती नगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी दिली.
जायकवाडीसाठी निळवंडे धरण रिकामे केले असले तरी मुळा व भंडारदरा धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यास न्यायालयाची स्थगिती असून, या याचिकेची पुढील सुनावणी दि. १६ डिसेंबरला होणार आहे, त्यामुळे आजच्या बैठकीत त्यावर चर्चा टाळण्यात आली.  

Story img Loader