भंडारदरा धरणातून जायकवाडीसाठी उद्यापासून (गुरुवार) पाणी सोडण्यात येणार आहे. तीन टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन असून ६ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. मात्र भंडारदरा धरणातील पाण्याची कमी झालेली पातळी आणि धरणाच्या पाणी सोडण्याच्या यंत्रणेची दुरवस्था यामुळे धरणातून अधिक वेगाने पाणी सोडण्यात यावेळी अडचणी येणार आहेत. त्यामुळे मागील आवर्तनाच्या तुलनेत जायकवाडीचे हे विशेष आवर्तन अधिक काळ सुरु राहण्याची शक्यता आहे.
जायकवाडीसाठी भंडारदरा-निळवंडे धरणातून तीन टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन आहे. मागील महिन्यात अडीच टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळेप्रमाणेच भंडारदऱ्यातून सोडलेले पाणी निळवंडे धरणात जमा होईल आणि निळवंडे धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर प्रवरा नदीपात्रात पडेल. मात्र  धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे अधिक वेगाने जास्त काळ या आवर्तनात पाणी सोडता येणार नाही. भंडारदरा धरणाला ५०, १००, १५० व २०० फुटांवर प्रत्येकी दोन अशा पाणी सोडण्यासाठी आठ मोऱ्या आहेत, मात्र त्यातील दीडशे फुटावरील दोन्ही मोऱ्यांच्या झडपा नादुरुस्त आहेत. २०० आणि १०० फुटावरील प्रत्येकी एक झडपही नादुरुस्त आहे. त्यामुळे या मोऱ्यांमधून जास्तीत जास्त ८०० क्युसेकने पाणी सोडता येणे शक्य आहे. भंडारदरा धरणातून वीजनिर्मितीसाठी ८३५ क्युसेक्स आणि गळतीचे १५ क्युसेक्स अशा ८५० क्युसेक्सचा विसर्ग २५ नोव्हेंबरपासून सुरु असून आवर्तन काळातही तो सुरुच राहील. अधिक वेगाने पाणी सोडण्यासाठी मागील आवर्तनाप्रमाणेच या आवर्तनातही स्पील वे चा वापर करण्यात येणार आहे. भंडारदऱ्याच्या सांडव्याजवळ असणाऱ्या स्पीलवेला २६ फूट उंचीची दोन दारे आहेत. त्यातून ५२ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग धरण पूर्ण भरलेले असताना सोडता येतो. या स्पीलवेचा तळतलांक १८९.७० फूट असून त्यापेक्षा जास्ती असणारे पाणीच स्पीलवेतून सोडता येते. स्पीलवेच्या तळतलांकाच्या खाली असणारे ६ हजार ६४७ दशलक्ष घनफूट पाणी स्पीलवेतून सोडता येत नाही. आज सायंकाळी भंडारदरा धरणातील पाणीसाठा ८ हजार ४७१ दशलक्ष घनफूट होता व पाण्याची पातळी २०२ फूट होती. त्यामुळे जेमतेम १ हजार ८०० दशलक्ष घनफूट पाणी स्पीलवेतून सोडता येणार आहे. त्यातही धरणातील पाण्याची पातळी जसजशी कमी होईल. तसतसे स्पीलवेतून बाहेर पडणाऱ्या
पाण्याचे प्रमाण कमी होणार आहे. त्यामुळे पहिले तीन-साडेतीन दिवस पाच ते सहा हजार क्युसेक्सने धरणातून पाणी सोडता येईल. त्यानंतर धरणाच्या मोऱ्यांतून पाणी सोडावे लागेल.
भंडारदऱ्याच्या स्पीलवेतून पाणी सोडणे बंद झाल्यानंतर निळवंडेच्या सांडव्यावरुनही वाहणारे पाणी काही तासातच बंद होईल. त्यानंतर उर्वरित सुमारे बाराशे क्युसेक्स पाणी सोडण्यासाठी निळवंडे धरणाच्या विमोचकाचा वापर केला जाणार आहे. या विमोचकातून १ हजार ७५० क्युसेक्सच पाणी सोडता येते. त्यामुळे निळवंडेचा ओव्हरफ्लो बंद झाल्यानंतर दिवसभरात सुमारे १५० ते १५५ क्युसेक्सच पाणी नदीपात्रात पडू शकेल. त्यामुळे १ हजार २०० क्युसेक्स पाणी सोडण्यासाठी आठ ते नऊ दिवसाचा कालावधी लागेल. जायकवाडीसाठीचे मागील आवर्तन सहा दिवस चालले होते. त्यात अडीच टीएमसी पाणी सोडण्यात आले. यावेळी मात्र वरील परिस्थितीमुळे तीन टीएमसी पाणी सोडण्यासाठी दहा ते बारा दिवसांपेक्षाही अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. जायकवाडीसाठी पाणी सोडल्यानंतरही निळवंडे-भंडारदरा धरणात सुमारे दहा टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. त्याचे योग्य नियोजन केल्यास भंडारदऱ्याच्या लाभक्षेत्राची वर्षभराची गरज निश्चितपणे भागू शकेल.