वाळू चोरी रोखण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांच्या ‘कथीत’ आशीर्वादाने कार्यरत असलेल्या खासगी पथकातील दोघा जणांच्या अंगावर वाळू माफियांनी ट्रॅक्टर घातल्याची घटना येथे घडल्याची जोरदार चर्चा सुरू असल्याने महसूल खात्याची चांगलीच शोभा झाली आहे. या घटनेत दोघे जखमी झाल्याच्या चर्चेच्या पाश्र्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मालेगाव उपविभागाकरिता वाळू चोरी रोखण्यासाठी विशेष भरारी पथकाची तातडीने करण्यात आलेली निर्मिती तसेच या पथकासाठी असलेली कडक आचारसंहिता, यामुळे या कथीत घटनेला एकप्रकारे पुष्टीच मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे
यंदा वाळू लिलाव रखडले असले तरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोसम व गिरणा नदीपात्रातून मोठय़ा प्रमाणावर बेकायदेशीरपणे वाळू उपसा होत असल्याची लोकांची ओरड आहे. या प्रकारास महसूल यंत्रणेचा आशीर्वाद असल्याची चर्चा आहे. कारवाई टाळण्यामागील गौडबंगाल काही दिवसांपासून अधिक चर्चेत आहे. त्यातच एका अधिकाऱ्याने महसूल यंत्रणेच्या वाहनाद्वारे वाळू चोरीला अटकाव करणे अशक्य असल्याचे कारण देत एका खासगी वाहनाद्वारे ही चोरी रोखण्यासाठीची शक्कल लढविली. या खासगी वाहनाच्या सहाय्याने सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाळू चोरांविरूध्द कारवाई केली तर ते समजण्यासारखे आहे. मात्र या वाहनातून चक्क इतर माणसे अशी कारवाई करण्यासाठी फिरत असतात. वाळू चोरांना पकडल्यावर त्यांच्याशी तडजोड करतात, असा आरोप करण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांच्या कथीत आशीर्वादामुळे या खासगी व्यक्तींनी घातलेला धुमाकूळ वाळू चोरांना देखील हैराण करणारा ठरला असल्याची चर्चा आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण करणे बऱ्याचवेळा वाळू माफियांना जड जाते. त्यातच त्यांच्यात अंतर्गत धुसफूस सुरू होती. त्याचीच परिणती म्हणून येसगाव शिवारात पाठलाग करणाऱ्या दुचाकीवर वाळू माफियांनी ट्रॅक्टर घातल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेत दोघे जखमी झाले असून त्यातील एक जण शहरातील एका रूग्णालयात तर दुसरा नाशिकच्या रूग्णालयात उपचार घेत आहे. हा सर्वच मामला चोरीचा असल्याने त्याविषयी गुप्तता पाळण्यात आली. तसेच पोलीस ठाण्यात जाण्याची तसदीही घेण्यात आली नाही. तथापि अशा प्रकारे कोणताच प्रकार घडला नसल्याचा खुलासा तहसीलदार दीपक पाटील यांनी केला आहे.
महसूल यंत्रणा या विषयी कानावर हात ठेवत असली तरी तालुक्यात या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच उपविभागीय अधिकारी उदय किसवे यांनी मालेगावबरोबरच नांदगाव व चांदवड तालुक्यातील गौण खनिज चोरी रोखण्यासाठी तातडीने विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाच्या निर्मितीमागे या कथीत घटनेमुळे महसूल यंत्रणेचे निघालेले धिंडवडे हेच कारण असल्याचा अर्थ काढला जात आहे. धान्य पुरवठा अधिकारी सुभाष भाटे यांच्या नेतृत्वाखालील या भरारी पथकात दोन मंडल अधिकारी व सात तलाठय़ांचा समावेश आहे. या पथकाने कारवाईसाठी जाण्यापूर्वी प्रांतधिकाऱ्यांना माहिती द्यावी व केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल त्वरीत देण्याचे बंधन टाकण्यात आले आहे.
अवैध पथकाच्या ‘बेअब्रु’ने वाळू चोरी विरोधात आता भरारी पथक
वाळू चोरी रोखण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांच्या ‘कथीत’ आशीर्वादाने कार्यरत असलेल्या खासगी पथकातील दोघा जणांच्या अंगावर वाळू माफियांनी ट्रॅक्टर घातल्याची घटना येथे घडल्याची जोरदार चर्चा सुरू असल्याने महसूल खात्याची चांगलीच शोभा झाली आहे. या घटनेत दोघे जखमी झाल्याच्या चर्चेच्या पाश्र्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मालेगाव उपविभागाकरिता वाळू चोरी रोखण्यासाठी विशेष
First published on: 06-12-2012 at 02:51 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharari pathak in against of sand robbery in because of illigal team