जकात विभागातील भरारी पथकाने केवळ १० दिवसात ७० जकात चोरीची प्रकरणे उघडकीस आणली असून येणाऱ्या दिवसात भरारी पथकांची संख्या वाढविणार असल्यामुळे शहरातील विविध भागातील जकात चोरीची अनेक प्रकरणे उघडकीस येणार आहे. त्यामुळे अनेक व्यापारांचे धाबे दणाणले आहे. या जकात चोरी प्रकरणात एकूण ८ लाख २० हजार ७२५ रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.
नवे सहायक आयुक्त म्हणून महेश धामेचा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जकात चोरी मोहिमेला प्रारंभ करताच चोरांच्या मुसक्या आवळणे सुरू केले आहे. जकात चोरीला आळा घालण्यासोबतच विभागाचे उत्पन्न वाढीवर त्यांनी भर दिला आहे. जकात विभागात चोरीच्या प्रकरणासंदर्भात राजकीय दडपण आले तरी कारवाई केलीच पाहिजे अशी सूचना त्यांनी भरारी पथकांना दिली आहे. जकात चोरी पकडण्यासाठी सध्या १४ भरारी पथक तयार करण्यात आले असून त्यात येत्या काही दिवसात आणखी वाढ करणार आहे. प्रत्येक जकात नाक्यावर एक भरारी पथक आणि काही खबरे राहणार आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये अमरावती रोड, हिंगणा रोड, भंडारा रोड, वर्धा रोड, रेल्वे स्टेशन परिसर आणि शहरात येणाऱ्या विविध जकात नाक्यावर धाडी टाकून जकात चोरी उघडकीस आणल्या आहेत. कारवाईचा धडाका पुढे सुरू राहणार आहे. कोणत्याही प्रकारचा माल आयात करीत असताना जकात कराची कार्यवाही पूर्ण करूनच शहरात आणावा, चोरटय़ा मार्गाने माल आणल्याचे भरारी पथकाच्या लक्षात आल्यास दंडाची आकारणी आणि जकात नियमानुसार कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. नियमानुसार जकात चोरीने आणलेल्या मालावर जकात कराच्या दहापट दंड वसूल करण्यात येतो. यामुळे जकात करदात्यांनी सावध राहून कारवाई टाळावी, असे आवाहन धामेचा यांनी केले.
गेल्या काही वर्षांत सर्वच वस्तूंच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. त्यामुळे आयातीत मालावर आकारण्यात येणारे जकात शुल्कही वाढले आहे. परंतु त्या तुलनेत जकात विभागाचे उत्पन्न मात्र वाढू शकले नव्हते. यामुळे जकात विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर शंका व्यक्त करण्यात येत होती. जकात समितीचे अध्यक्ष किशोर डोरले यांनी या संदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधून त्याला पाठपुरावा केला.
जकात चोरीची प्रकरणे मोठय़ा प्रमाणावर पुढे यावी आणि त्यासाठी खबऱ्यांचे जाळे पसरवून त्यांना आकर्षक बक्षीस द्यावे, अशी अपेक्षा डोरले यांनी व्यक्त केली.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा