शिवसेनेचे भगवे वादळ निर्माण व्हावे, असे साकडे मराठवाडय़ातील शिवसैनिकांनी तुळजाभवानीला नवरात्रात घातले. दसरा मेळाव्याला आशीर्वाद देणारी भवानीज्योत जिल्हय़ातील पदाधिकारी व शिवसैनिक घेऊन रवाना झाले. शिवसैनिकांच्या भवानीज्योत यात्रेत आमदार ओमराजे निंबाळकर यांनी ‘आगामी निवडणुकांत काँग्रेसमुक्त सरकार आणू’ असा निर्धार केला.
लातूर व उस्मानाबाद जिल्हय़ांतील सेनेचे ५० तालुका व शहर शाखांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी तुळजापुरात सहाव्या माळेदिवशी सुमारे ५५ भवानीज्योत आणल्या होत्या. तुळजापुरातील भवानीज्योत शहरप्रमुख सुधीर कदम व बाळासाहेब शिंदे यांनी प्रज्वलित करून आमदार निंबाळकर व ज्ञानराज चौगुले यांच्याकडे सुपूर्द केली. मंदिरात तुळजाभवानीची आरती व पूजा केल्यानंतर पुजारी सुधीर कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुयश चिंतिले. या वेळी ‘जय भवानी जय शिवाजी’च्या गजरात शिवसैनिकांनी मंदिर परिसर दणाणून सोडला. प्रा. रवींद्र गायकवाड यांनी चांदीची तलवार देवीच्या पायाला लावून विधिवत पूजा करून दसरा मेळाव्यात ठाकरे यांना देण्यासाठी जिल्हाप्रमुखांकडे सुपूर्द केली.

Story img Loader