सांगली जिल्ह्य़ातील बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना गंडा घालण्याच्या प्रकरणात आरोपी असलेले रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कापसे याची पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास आठवले यांनी हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी शहरातील भीमा बागूल यांची नियुक्ती केली आहे.
पदमुक्त केलेले कापसे यांच्याबद्दल पक्षातही गंभीर स्वरूपाच्या तक्रारी होत्या. कापसे व त्यांचा मुलगा विकी कापसे यांनी सांगली जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रेल्वेत नोकरीला लावून देतो असे सांगून चार कोटी रुपयांची फसवणूक केली होती. विकी याला अटक करण्यात आली असून राजाभाऊ कापसे फरार आहे. तासगाव पोलिसांच्या एका पथकाने शुक्रवारी वाकडी येथे कापसे याचा शोध घेतला. पण त्याचा ठावठिकाणा मिळाला नाही. कापसे याच्यामुळे रिपब्लिकन पक्षाची प्रतिमा डागाळली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे राजकीय नुकसान होऊ नये म्हणून कापसे याला डच्चू देण्याचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष आठवले यांनी घेतला. यासंदर्भात पक्षाचे जिल्ह्यातील नेते अशोक गायकवाड, विजय वाकचौरे, दीपक गायकवाड, बाळासाहेब गायकवाड तसेच संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव यांच्याशी चर्चा केली होती. अखेर कापसे याच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आठवले यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी बागूल यांची नियुक्ती केली आहे. आज पक्षाचे संपर्कनेते श्रीकांत भालेराव व अशोक गायकवाड यांनी येथे येऊन पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बागूल यांना नियुक्तीचे पत्र दिले. बागूल यांचे नाव सर्वसहमतीने ठरविण्यात आले. कापसे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले विजय वाकचौरे, बाळासाहेब गायकवाड हेदेखील आता पक्षात सक्रिय झाले आहेत. त्यांनी बागूल यांच्या नावाची शिफारस केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा