– १५ जून रोजी बंदची हाक
– अर्धा टक्का अधिक व्हॅट देण्याची तयारी
यंत्रमागनगरी अशी वैशिष्टय़पूर्ण औद्योगिक ओळख असणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ातील भिवंडी शहरातील व्यापाऱ्यांनीही ‘एलबीटी’ अर्थात स्थानिक संस्था करास विरोध दर्शविला आहे. राज्यातील इतर महापालिका क्षेत्रांप्रमाणेच भिवंडीतही २२ मार्चपासून एलबीटी लागू करण्यात आला. मात्र येथील व्यापाऱ्यांनी त्यास अतिशय थंड प्रतिसाद दिला. व्हॅट लागू झाल्यानंतर कोणताही नवा कर लागू करणार नाही, असे आश्वासन शासनाने व्यापारी वर्गास दिले होते. त्यानंतरही एक टक्का अतिरिक्त व्हॅट लादण्यात आला आणि आता पुन्हा स्थानिक संस्था कर लादू पाहत आहे. व्यापारी तसेच ग्राहकांवर हा अन्याय असून या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय भिवंडीतील समस्त व्यापारी वर्गाने घेतला आहे.
‘एलबीटी’विषयी व्यापाऱ्यांना प्रशासनाची बाजू समजाविण्यासाठी महापालिकेने ४ जून रोजी मीनाताई ठाकरे सभागृहात एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेत व्यापाऱ्यांनी एलबीटीऐवजी आणखी अर्धा टक्का व्हॅट देण्याची तयारी दर्शवली. तरीही प्रशासन एलबीटीच्या अंमलबजावणीवर अडून राहिले. त्यामुळे सभात्याग करून व्यापाऱ्यांनी या विरोधात शनिवार १५ जून रोजी भिवंडी बंदची हाक दिली आहे.
भिवंडी शहरातील सर्व व्यापारी संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला असून आंदोलनाची रूपरेखा ठरविण्यासाठी १४ जून रोजी मीनाताई ठाकरे सभागृहात दुपारी ३ वाजता एक सभा आयोजित करण्यात आली आहे. या बंदमध्ये शहरातील सर्व सात लाख यंत्रमाग सहभागी होतील, अशी माहिती भिवंडी यंत्रमाग संघटनेचे शरदराम सेजपाल यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा