भिवंडीतील वस्त्रोद्योगाला आता नवसंजीवनी मिळणार असून त्यास इंडिया इंटरनॅशनल टेक्सटाईल मशिनरी एक्झिबिशन सोसायटीचे (आयटीएमई) मार्गदर्शन लाभणार आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या या उद्योगात आता नवनवीत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. सोमवारी भिवंडीत या संदर्भात झालेल्या एका परिसंवादानंतर हा निर्णय घेण्यात आला.
या परिसंवादात आयटीएमई सोसायटीचे उपाध्यक्ष देवेल डेंबोला, कार्यकारी संचालिका सीमा श्रीवास्तव, केतन संघवी, सासमिरा पॉवरलूमचे समन्वयक बी. डी. चॅटर्जी आदींनी विचार व्यक्त केले. आशिया खंडातील विविध देशांमधील वस्त्रोद्योगांची माहिती या वेळी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे देण्यात आली.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चीन, तैवान, रशियासारखे देश कापड उद्योगात बरेच पुढे गेले आहेत. भारतातील उद्योग योग्य मार्गदर्शनाअभावी मागे पडला आहे. या उद्योगाला ऊर्जितावस्था लाभावी म्हणून केंद्र शासन  राबवित असलेल्या विविध कल्याणकारी योजना संबंधितांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळेच भिवंडीतील वस्त्रोद्योग डबघाईला आला. परिसंवादात या सर्व वास्तवाचा ऊहापोह झाला. आता ग्लोबल टेक्सटाईल तसेच आयटीएई या दोन संस्था भिवंडीतील उद्योजकांना मदतीचा हात देणार आहेत. २२ व २३ जून रोजी मुंबईत यंत्रमाग उद्योगाविषयी एक मोठे प्रदर्शन भरविले जाणार आहे, अशी माहिती आयटीएमईच्या सीमा श्रीवास्तव यांनी दिली.     

Story img Loader