सिडकोमधील प्रभाग ४५ मध्ये शुभम पार्क व उत्तमनगर परिसरात आमदार निधीतील विविध विकास कामांचे भूमिपूजन आ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
उत्तमनगर येथील १२ इमारत असलेल्या शुभम पार्क सोसायटीतील ४५० सभासदांचे १० वर्षांपासून सातबारा उताऱ्यावर नाव लागलेले नव्हते. तसेच शुभम पार्क सोसायटीच्या विविध समस्या होत्या. शुभम पार्क कला, क्रीडा, सांस्कृतिक शैक्षणिक मंडळाच्या अध्यक्षांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत समस्या सोडविण्यासाठी आ. भोसले यांना साकडे घातले. भोसले यांनी सर्कल, तलाठी यांना सूचना देऊन सभासदांची नावे सातबाऱ्यावर त्वरित लागली पाहिजेत, असे सुनावले. त्यानुसार सातबाऱ्याला नाव लागून दाखल्यांचे वितरणही करण्यात आले. नगरसेविका रत्नमाला राणे यांनीदेखील याठिकाणी त्यांच्या निधीतून कूपनलिका करून दिली आहे. बगिचाकरिता १० लाख रुपये, व्यायाम साहित्यासाठी पाच लाख असा एकूण १५ लाख रुपयांचा निधी दिला असून, लोकविकासाकरिता विरोधी पक्षातील नगरसेवकांच्या प्रभागातदेखील निधी देऊन विकास कामे केलेली आहेत. कूपनलिकेमुळे पाण्याची समस्या मिटली आहे. या वेळी आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश गुंजाळ यांनी केले, तर स्वागत रवींद्र काकड यांनी केले. व्यासपीठावर भूषण राणे, प्रकाश गुंजाळ, दिलीप देवांग आदींसह महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. नागरिकांनी पोलीस गस्त पथक या परिसरात येत नसल्याने सोसायटीतील गरीब कुटुंबांना काही समाजकंटकांकडून त्रास होत असल्याची तक्रार केली. पोलीस गस्त पथकाची यानिमित्ताने मागणी करण्यात आली आहे. आभार प्रकाश गुंजाळ यांनी मानले.