आमच्या शिक्षण संस्थांमध्ये कोणाला गैरव्यवहार दिसत असेल तर पोलीस कारवाई करावी, उलट पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्यात कामांचे वाटप होताना गैरव्यवहार होत असल्याचा आरोप जिल्हा बँकेचे अध्यक्ष अद्वय हिरे यांनी केला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत धुळे मतदार संघातून भुजबळ यांनी आपल्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हानही त्यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिले.
थकबाकीवरून जिल्हा बँकेच्या तीन संचालकांचे पद रद्द करण्याची कारवाई टाळण्यासाठी सहकार खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला ११ लाखाची लाच घेताना हिरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत पकडून दिले.
या कारवाईनंतर पालकमंत्र्यांच्या इशाऱ्यावरून हा अधिकारी बँकेला त्रास देण्याचे उद्योग करीत होता असा आरोप हिरे यांनी केला होता. त्यास उत्तर म्हणून आ. जयंत जाधव यांनी हिरेंवर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत त्यांच्या अधिपत्याखालील शिक्षण संस्थांविरोधात गैरव्यवहार होत असल्याचे तसेच हिरेंना आपल्या पूर्वीच्या मतदार संघात रस्त्यांची दुरूस्तीही करता आली नसल्याची टीका केली होती.
या पाश्र्वभूमीवर हिरे यांनी पत्रकार परिषद घेतली. वादग्रस्त कारभारामुळे विधानसभा निवडणुकीत येवला व नांदगाव या दोन्ही ठिकाणी भुजबळांना निवडून येणे अवघड असल्याचा दावा त्यांनी केला. हिरे घराण्याने विकासाची अनेक कामे केली असल्याचे त्यांनी नमूद केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा