शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ३८ कोटी रुपयांच्या पाटोदा पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी करून आ. छगन भुजबळ यांनी कामासंदर्भात काही सूचना केल्या.
शहराला लवकरच दिवसाआड पाणी देण्याचे आश्वासन आपण निवडणूक प्रचारादरम्यान दिले असून त्याची पूर्तता करण्यास वचनबद्ध असल्याची ग्वाहीही भुजबळ यांनी दिली.
पाटोदा साठवण तलावात बसविण्यात येत असलेली नवीन यंत्रणा, पंपिंग हाऊस तसेच जलवाहिनी आदी कामांची पाहणी त्यांनी केली. पालखेड धरणाच्या पाण्यातून यावेळी प्रथमच पूर्ण क्षमतेने सुमारे १७ दशलक्ष घनफूट जलसाठा पाटोदा येथील साठवणूक तलावात करण्यात येणार आहे.
सध्या मनमाडमध्ये सात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. लवकरच तो तीन ते चार दिवसाआड आणि काही महिन्यात दिवसाआड करण्याची योजना आहे. त्या दृष्टिने जलवाहिनीसह वीजपंप तसेच मनमाड येथील नवीन जलशुद्धीकरण केंद्राचे कामही प्रगतीपथावर असल्याचे आ. भुजबळ यांनी नमूद केले.