सध्याचे युग बदलत आहे. संगणकाच्या या युगात प्रत्येक नागरिक इतका व्यस्त झाला की, सार्वजनिक व सांस्कृतिक जीवनात तो आपल्या रुढी-परंपरा विसरत चालता आहे. या रुढी-परंपरा टिकवून ठेवणे काळाची गरज आहे. त्यामुळेच लहान मुलींवर चांगले संस्कार रुजविण्यासाठी भुलाबाईच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भाजपच्या नगरसेविका भावना कदम यांनी केले.
त्या म्हणाल्या, त्या काळातील लहान मुलींचा आवडता कार्यक्रम म्हणजे भुलाबाईचे गीत. दसऱ्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत पाच दिवस हा उत्सव घरातील प्रत्येक लहान मुलींसाठी त्यांच्या आईकडून आयोजित करण्यात येत होता.
‘शंकर पार्वती’च्या मूर्तीची तात्पुरती प्रतिष्ठापना करून भुलाबाईची गाणी म्हटली जात होती. प्रत्येक गाण्यात शंकर आणि पार्वतीचे प्रेम, त्यांचा विश्वास व भक्ती दर्शविली जाते. त्यामुळे लहान मुलींवर लहानपणापासूनच चांगले संस्कार घडविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे हे कार्य या माध्यमातून करण्यात येत होते; परंतु आजकालच्या काळात सध्या ‘भुलाबाई’चे कार्यक्रम क्वचितच बघायला मिळतात, ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचे त्या म्हणाल्या.
तसेच त्या दरवर्षी ‘भुलाबाई’च्या गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन आपल्या घरी करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला परिसरातील लहान मुलींना त्यांच्या आईना निमंत्रित करून परंपरेची आठवण कायम करून दिली जाते. जेणेकरून लहान मुलींना आपली संस्कृती, आपल्या रुढी-परंपरांची जाणीव राहावी. यातूनच त्यांच्यावर चांगले संस्कार घडून त्यांचे वैवाहिक जीवन सुखी व समृद्ध होईल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रमाणेच अन्य स्त्रियांनीदेखील ‘भुलाबाईच्या गाण्यांच्या’ कार्यक्रमांचे आयोजन करून भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्याचे आवाहनही कदम यांनी यावेळी उपस्थितांना केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा