योगाभ्यासाचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा, यासाठी नवी मुंबई पालिकेने प्रयत्न सुरू केले असून काही शिक्षकांच्या प्रशिक्षणानंतर आता योग विद्या निकेतन व नवी मुंबई क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईतील मोठय़ा उद्यानातील एक कोपरा योग वर्गासाठी राखून ठेवण्यात येणार आहे. त्याची सुरुवात ऐरोली सेक्टर १५ येथे नुकत्याच लोकार्पण झालेल्या नक्षत्र उद्यानात मोफत योग वर्ग सुरू करून करण्यात आली.
नवी मुंबईत योगाचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी नवी मुंबई पालिकेने शिक्षण विभागातील काही शिक्षकांना नुकतेच योगाभ्यासाचे प्रशिक्षण दिले आहे.  पालकमंत्री गणेश नाईक यांच्या संकल्पनेनुसार पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना लहानपणापासून योगाभ्यास देण्याचा विचार आहे. आमदार संदीप नाईक यांच्या आमदार निधीतून पालिकेने नुकताच ऐरोली सेक्टर १४, १५ भागात एक इको जॉगिग उभारला आहे. एक किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या या जॉगिक ट्रॅकच्या खाडीकिनारी बाजूस चांगल्याप्रकारे सुशोभिकरण करण्यात आले असून नवी मुंबईत आढळणाऱ्या पशुपक्ष्यांची माहिती फलकाद्वारे देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्रांतीस्थळ व बैठक व्यवस्था तयार करण्यात आली आहेत. या ट्रॅकच्या सुरुवातीस नक्षत्र उद्यान तयार करण्यात आले असून २७ प्रकारच्या वनौषधी लावण्यात आलेल्या आहेत. याच उद्यानातील एक कोपरा योग धारणा करणाऱ्या साधकांसासाठी ठेवण्यात आला असून या ठिकाणी  योग विद्या निकेतनच्या वतीने मोफत योग वर्ग घेतले जाणार आहेत. पद्मश्री सदाशिव निंबाळकर व त्यांच्या पत्नी योगगुरू शकुंतला निंबाळकर, खासदार संजीव नाईक आणि स्थानिक नगरसेवक यांच्या उपस्थितीत पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या योग वर्ग व इको ट्रॅकचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. ऐरोलीत लवकरच डॉ. बाबासाहेब आंबडेकर आंतरराष्ट्रीय स्मारक उभे राहणार असल्याने या उपनगराची एक वेगळी ओळख तयार होणार आहे, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला. मानव विकास फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने हा इको ट्रॅक व योग वर्ग सुरू व्हावेत यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. मोफत योग वर्गासाठी सुधा जाधव ९८२१०६३०९७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader