जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच बदलापूर येथील ग्रामीण रुग्णालयाने संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत गेल्या शनिवारी बदलापूर येथे राबविण्यात आलेल्या महाआरोग्य मेळाव्यात अंबरनाथ तालुक्यातील तब्बल पाच हजार रुग्णांनी लाभ घेतला.  विद्यार्थी, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांचा त्यात सहभाग होता. कुळगावातील मराठी शाळेत विविध व्याधींचे तपासणी कक्ष होते. तसेच शाळेच्या प्रांगणात आरोग्यविषयक माहिती देणारे प्रदर्शन भरविण्यात आले होते. पालिका हद्दीत ग्रामीण रुग्णालय असणारे बदलापूर हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे. या रुग्णालयामुळे
परिसरातील ग्रामीण जनतेची सोय झाली आहे. या रुग्णालयामार्फत सर्वाना शासनाच्या सर्व आरोग्य सुविधा पुरविण्यात येतील, अशी ग्वाही आरोग्य उप संचालक डॉ. संजय कांबळे यांनी दिली. आमदार किसन कथोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. बी. कुलकर्णी, डॉ. कैलास पवार, पंचायत समितीच्या उपसभापती शैला बोराडे, साकीब गोरे आदी याप्रसंगी उपस्थित होते.