मोठा पडदा आणि छोटा पडदा यात नेहमी एक अंतर राहिले आहे. अवघ्या तीन तासांतले मोठय़ा पडद्यावरचे मनोरंजन आणि दररोज चालणारे छोटय़ा पडद्यावरचे मनोरंजनाचे दळण हा एवढा विरोधाभास या दोन माध्यमांमध्ये अंतर राखण्यात पुरेसा आहे. असे असूनही आशय-विषय-निर्मिती, तांत्रिक प्रगतीतील बदलांनी गेल्या काही काळात या दोन माध्यमांचे अंतर काहीसे पुसट केले आहे. म्हणूनच चित्रपट दिग्दर्शक-निर्माता म्हणून नावाजलेली नावे आज छोटय़ा पडद्यावर मालिकेच्या निर्मिती-दिग्दर्शनातही तेवढाच रस घेतात. मोठे निर्माते आणि मोठय़ा मालिका हा टेलिविश्वातला ट्रेण्ड नेमका कुणाच्या फायद्याचा? प्रेक्षकांना यातून नेमकं काय मिळतं याहीपेक्षा ट्रेण्डसेटर म्हणून या बदलत्या प्रवाहात सहभागी झालेल्या निर्माता-दिग्दर्शकांचा यामागचा विचार काय हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
स्टार प्लस वाहिनीने दिग्दर्शक संजय लीला भन्साळीला हाताशी धरत ‘सरस्वतीचंद्र’ या भव्यदिव्य मालिकेची निर्मिती केली. यानिमित्ताने पहिल्यांदाच बॉलीवूडच्या नावाजलेल्या दिग्दर्शकाने निर्माता म्हणून छोटय़ा पडद्यावर प्रवेश केला. अर्थात भन्साळींची निर्मिती म्हणून त्यांच्या चित्रपटांप्रमाणेच मालिकाही तितक्याच भव्यदिव्य सेटवर घडविण्यात आली आहे. पण ही एक गोष्ट सोडली तर खरोखरच दिग्दर्शक भन्साळीच्या शैलीचा ठसा या मालिकेवर असेल का? ‘नियमित दिग्दर्शन जरी दुसरे कोणी करणार असले तरी कथानक माझ्या मांडणीनुसारच पुढे सरकणार आहे. त्यामुळे माझीच मालिका असेल यात शंका नाही’, असे संजय लीला भन्साळीने म्हटले.
पण म्हणून त्यांचा चित्रपट जितका गाजतो तेवढी लोकप्रियता अद्याप या मालिकेला तरी मिळालेली नाही. मराठी वाहिन्यांनी हा प्रयोग कधीच यशस्वी केला आहे.
स्मिता तळवलकर, महेश कोठारे, केदार शिंदे, सचिन पिळगांवकर अशी सिनेमा गाजविणाऱ्यांची मांदियाळी याआधी मराठी वाहिन्यांवर निर्माता-दिग्दर्शक म्हणून सक्रिय आहे. त्या मांदियाळीत आता महेश वामन मांजरेकर हे नावही सामील झाले आहे. झी मराठी वाहिनीवर ‘तुझं माझं जमेना’ या मालिकेच्या निमित्ताने मांजरेकरांचा टेलिव्हिजनवर प्रवेश होतो आहे. त्या सगळ्यांशी संवाद साधल्यावर दिग्दर्शक म्हणून असलेली त्यांची लोकप्रियता आणि प्रतिभा वाहिन्यांच्या पथ्यावर पडणारी आहे हे समीकरण त्यांना पक्कं ठाऊक असल्याचे लक्षात येते. आणि तरीही हे भान ठेवून या माध्यमात येताना प्रत्येकाचा एक वेगळा दृष्टिकोनही आहे. प्रेक्षकांना यामुळे सकस आणि वैविध्यपूर्ण मालिका पाहायला मिळतात. याबद्दल त्यांचे आणि वाहिन्यांचेही दुमत नाही.
सिनेमा आणि टेलिव्हिजन दोघांचा मध्य गाठण्याचा प्रयत्न – महेश कोठारे
माझी स्वत:ची निर्मिती संस्था असल्याने चित्रपट आणि मालिका दोन्ही क्षेत्रात स्वत:चे अस्तित्व जाणवून देणे हे भाग आहे. माझ्यासारखा दिग्दर्शक मालिका करतो तेव्हा तो नेमकं कशा प्रकारे मालिका करणार याबाबत लोकांनाही उत्सुकता असते. आणि वाहिन्यांसाठी असे लोकप्रिय नाव घेणे हे फायद्याचे असते. त्यामुळे वाहिन्यांकडून तुम्हाला त्याच आदराने पाहिले जाते. पण दिग्दर्शक म्हणून मालिका करीत असताना सिनेमा आणि टेलिव्हिजन या दोन्ही माध्यमांचा उत्कृष्ट मिलाफ कसा साधता येईल यासाठी मी प्रयत्नशील असतो. टीव्हीचं तंत्रज्ञान आणि सिनेमाचं तंत्रज्ञान वेगळं आहे.
या दोन्हीचा मध्य गाठून लोकांना वेगळा शो कसा देता येईल जेणेकरून त्यांना सिनेमा पाहिल्याचाही आनंद मिळेल आणि टेलिव्हिजनचा आनंदही हिरावून घेतला जाणार नाही असा माझा दृष्टिकोन असतो. पण तरीही टेलिव्हिजनवर काम करताना वाहिन्यांच्या गरजेनुसार वेळेत काम करणं हीसुद्धा आपली जबाबदारी आहे हे लक्षात घेऊनच काम केले तर यश मिळते.
माझ्यातला प्रेक्षक पहिल्यांदा सुखावला पाहिजे-केदार शिंदे
प्रामाणिकपणे सांगायचे तर आम्ही आमच्या नावासाठी काम करतो. एवढय़ा वर्षांत काम करून जे नाव कमावलंय त्याचाच उपयोग मालिकेसाठी निर्मिती-दिग्दर्शन करताना होतो. पण वाहिन्यांनी मालिका दिली आणि आपण केली तर ते सहज नसतं. आपण लोकांना त्या मालिकेतून काय देणार आहोत हा विचार करावाच लागतो. टेलिव्हिजन हा एकदा बघून सोडून देण्याचे माध्यम नाही. माझ्या घरचा सदस्य दररोज टीव्ही बघतो. त्यामुळे त्याच्यावर माझं जेवढं प्रेम आहे तेवढं ते टीव्हीवरही असलं पाहिजे. दुसरं म्हणजे, टीव्हीसाठी कुठलीही मालिका करताना मी थेट घराघरांत पोहोचतो. त्यामुळे माझी जबाबदारी जास्त वाढलेली असते. दिग्दर्शक केदार शिंदेची मालिका म्हणून प्रेक्षकांच्या अपेक्षा जास्त असणे हे स्वाभाविक आहे. तशी अपेक्षा प्रत्येक कलाकृतीसाठीच असते. तुम्ही तुमच्या यशाचा मापदंड म्हणून एक रेष आखलेली असते. त्यामुळे त्याच्या पुढची रेष जास्त मोठी असायला हवी ही काळजी घेतलीच पाहिजे. मालिकेची निर्मिती-दिग्दर्शन करतानाही प्रेक्षकांनाही काहीतरी वेगळं दिलं पाहिजे हा विचार माझ्यासाठी महत्त्वाचा असतो. कारण मीसुद्धा पहिला प्रेक्षक आहे. त्यामुळे माझ्यातला प्रेक्षक सुखावला तरच दुसऱ्यांनाही मालिकेतून आनंद मिळेल, असा अंदाज काढता येतो.
दूरचित्रवाणी हे ‘टी-२०’ क्रिकेटसारखं – महेश मांजरेकर</strong>
अनेक वर्षांपासून दूरचित्रवाणीवर काम करण्याची इच्छा होती, मात्र काम करेन तर माझ्या मनाप्रमाणेच, हा हट्टही होता. माझ्या मते दूरचित्रवाणी हे आजकालच्या ‘टी-२०’ क्रिकेटसारखे आहे. तुम्ही कितीही शिव्या घातल्यात, तरी हेच मनोरंजन क्षेत्राचे भविष्य आहे. कसोटी क्रिकेट कितीही आवडत असले, तरीही ‘टी-२०’ क्रिकेटला पर्याय नाही. त्याचप्रमाणे चित्रपट, नाटक वगैरे माध्यमे त्यांच्या त्यांच्या ठिकाणी उत्तम आहेत, पण टीव्ही हे भविष्य आहे. टीव्हीला मिळणारा बिझनेस, ग्लॅमर यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या सगळ्या गोष्टी आधीही कळत होत्या,
पण माझ्या मनाप्रमाणेच काम करेन, या हट्टापायी एवढा वेळ गेला. आताही मी जी मालिका घेऊन येत आहे, ती माझ्या मते तरी दर्जेदार बनली आहे. माझ्या मते माझ्यासारखेच चांगले निर्माते टीव्हीकडे वळले, तर इथेही चांगले विषय हाताळले जातील. कार्यक्रमांचा दर्जा नक्कीच सुधारेल.
बडे निर्माते आणि चांगले विषय-निखिल साने, झी मराठी
प्रेक्षकांना चांगल्या मालिका देण्याचा प्रयत्न झी मराठीने सातत्याने केला आहे. केदार शिंदे, रवी जाधव, सचिन पिळगावकर यांच्यासारख्या उत्तमोत्तम आणि दर्जेदार कलाकारांना व निर्माते-दिग्दर्शकांना आमच्याच वाहिनीने संधी दिली. महेश मांजरेकर यांनाही गेल्या अनेक वर्षांपासून दूरचित्रवाणीवर काम करण्याची इच्छा होती. त्यांनी काम करावे म्हणून मीच त्यांच्या मागे लागलो होतो. गेली दोन वर्षे सातत्याने पाठपुरावा करून या मालिकेसाठी त्यांना तयार केले. महेश मांजरेकर यांच्यासारखे बडे निर्माते आणि दिग्दर्शक या माध्यमाकडे वळल्यामुळे चांगले विषय टीव्हीच्या माध्यमातून लोकांपुढे येतील. विशेष म्हणजे ठरावीक भागांच्या मालिका करण्यावर आम्ही भर देत आहोत. मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळे विषय हाताळणाऱ्या दिग्दर्शकांनी टीव्हीकडे वळण्याची गरज आहे. टीव्हीवरील कार्यक्रमांचा दर्जा सुधारण्यासाठी या गोष्टीचा उपयोग होईल.
उत्तम कथा आणि पटकथा हाच मराठी सिनेमाचा जीव -सचिन खेडेकर
मराठी सिनेमामध्ये स्टार कलावंत नसतात. मराठी सिनेमा नेहमीच कथानकप्रधान, पटकथाप्रधान राहिला आहे. हिंदीमध्ये स्टार कलावंतांच्या विना चित्रपट करणे शक्य नाही. हिंदी सिनेमा कधीच बदलत नाही. स्टार कलावंत विशेषत: अभिनेते फक्त बदलतात, परंतु, हिंदी सिनेमाचा फॉम्र्युला कधीच बदलत नाही.