जिल्ह्य़ातील खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविण्यावर माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने घातलेल्या बहिष्काराला १०० टक्के प्रतिसाद मिळाला असल्याचा दावा केला. परंतु मुख्याध्यापक संघाचे जिल्हा सचिव व माणिक स्मारक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. यू. सूर्यवाड यांनी सचिवपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या दोन्ही शाळांमध्ये पोषण आहार शिजल्याची कबुली त्यांनी दिली.
मराठवाडा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने सरकारला दिलेल्या निवेदनात पोषण आहार व माध्यान्ह भोजन यापासून मुख्याध्यापक व शिक्षकांना बाजूला ठेवून ही जबाबदारी स्वतंत्र यंत्रणेवर सोपवावी, अशी मागणी करताना १६ ऑगस्टपासून पोषण आहार शिजविणार नसल्याचा इशारा दिला होता. या विषयी जिल्हा शिक्षण अधिकारी शिवाजी पवार यांनी येथील मुख्याध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मात्र, त्यात तडजोड झाली नाही. मागण्या मान्य होईपर्यंत बहिष्कार चालू राहणार असल्याचा इशारा मुख्याध्यापक संघटनेने दिला. परंतु जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हा सचिव सूर्यवाड हे मुख्याध्यापक असलेल्या माणिक स्मारक आर्य विद्यालय व सरजुदेवी भिकुलाल कन्या शाळेत पोषण आहार शिजला. या बाबत संपर्क साधला असता त्यांनी हे खरे असल्याचे सांगितले व संघाच्या जिल्हा सचिवपदाचा आपण राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader