उरल्यासुरल्या जैवविविधतेची सचित्र नोंद..!
पर्यावरणाचा अभ्यास केवळ पदवीपुरता मर्यादित न ठेवता त्याआधारे परिसरातील जैवविविधतेचे शास्त्रशुद्ध दस्तऐवजीकरण करण्याचा प्रयत्न रुईया महाविद्यालयातील प्रा. मनीषा कर्पे यांनी केला आहे. रुईया महाविद्यालयात प्राणिशास्त्र विषय शिकविणाऱ्या प्रा. कर्पे अंबरनाथ येथे राहतात. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी पी.एचडीसाठी त्यांनी शहराजवळील मलंगगड डोंगररांगांमधील काकोळे, चिखलोली तसेच भोज जलाशयाकाठची जैवविविधता हा विषय घेतला. त्यांनी जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली, तेव्हा खरे तर या भागातील पर्यावरणाचा ऱ्हास सुरू झाला होता. अर्निबध वृक्षतोडीने काकोळे तलावाकाठचे सदाहरित जंगल उद्ध्वस्त झाले होते. शेजारील औद्योगिक विभागाचा तळ्यास वेढा पडला होता. तेथील बांधकामांसाठी तळ्यातील पाण्याचा उपसा सुरू झाला होता. मात्र अशा रीतीने उजाड होण्याच्या मार्गावर असणाऱ्या या भागात त्यांना वनस्पती तसेच प्राण्यांच्या अनेक दुर्मीळ प्रजाती आढळल्या. त्या सर्वाची सचित्र नोंद करून त्यांनी अंबरनाथकरांना परिसरातील निसर्गाच्या श्रीमंतीची जाणीव करून दिली आहे. शहरातील पर्यावरणप्रेमींनी सामूहिकपणे प्रयत्न केले, तर निसर्गाचे है वेभव पुन्हा प्राप्त होऊ शकते, असा विश्वास त्यांनी वृत्तान्तशी बोलताना व्यक्त केला.
समृद्ध वन आणि प्राणिसंपदा
या तिन्ही जलाशयांच्या काठी प्रा. मनीषा कर्पे यांना एकूण ११५ प्रकारच्या वनस्पती आढळल्या. त्यात चिंच, जांभुळ, काजू, बोर, पिंपळ, वड, साग आदी वृक्ष होते. करवंदांच्या जाळी होत्या. त्यापैकी बहुतेक वृक्षांची आता बेसुमार कत्तल झाली आहे. काकोळे तलावाकाठचे बोरबन तर खूपच प्रसिद्ध होते. इथे बोरांची शेकडो झाडे होती. मुंबई परिसरातील अनेक पर्यावरणप्रेमी येथे वनभोजनासाठी येत होते. आता मात्र एखाददुसरे झाड गतवैभवाची आठवण देत उभे असलेले दिसते. तालीमखाना ही औषधी वनस्पतीही या परिसरात आढळते. या शोध मोहिमेत त्यांना सेलर लेमन, मोनार्च, गार्डन फ्लाइज, टायगर, क्रिमसन रोझ आदी दहा प्रकारची फुलपाखरे, सुगरण, किंगफिशर, बुलबुल, पोपट, घुबड, बगळे आदी २१ प्रकारचे पक्षी, गोगलगायी तसेच खेकडय़ांच्या प्रजाती आढळल्या आहेत. येथील जलाशयात त्यांना उत्तम प्रतीची कोळंबीही मिळाली. सध्या प्रा. मनीषा कर्पे दर रविवारी या परिसराला भेट देतात. काकोळे गावातील काही ग्रामस्थांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली तलावात मत्स्योत्पादन सुरू केले आहे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा