45निसर्गातल्या काही काही घटना अगदी अचंबित करणाऱ्या असतात. आता पाहा ना, पावसाची सुरुवात होते आणि लगेचच जमिनीतून डरांव डरांव करत बेडूक बाहेर येतात. मग इतके दिवस हे होते कुठे, इथेच होते तर दिसले कसे नाहीत आणि एकदम पाऊस पडताक्षणी कसे बाहेर आले, असे अनेक प्रश्न नेहमी पडतात, तसेच पक्ष्यांचेपण. थंडी पडायला लागली की पक्ष्यांचे थवे कुठून कुठून लांबून हजारो किलोमीटरचे अंतर कापून कसे येतात? त्यांच्या छोटय़ाश्या पंखांत इतकी ताकद कशी येते? त्यांना रस्ता कसा सापडतो? पाण्याची ठिकाणे कशी कळतात? नवीन जागी अन्न मिळण्याची खात्री कशी वाटते? ही पक्ष्यांची दुनिया खरेच आपल्याला विचार करायला भाग पाडते.

एखाद्या भूभागात अन्नाचा तुटवडा निर्माण होतो. अजून जास्त दिवस या भागात थांबले तर उद्या प्राणावर बेतेल अशी परिस्थितीसुद्धा निर्माण होऊ शकते आणि पक्षी स्थलांतराला सुरुवात करतात. आता पुढच्या ज्या भूभागात जाऊन थांबायचे, विश्रांती घ्यायची, मिळेल तेवढे खाऊन घ्यायचे आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला निघायचे तो भूभाग निवडताना काही शक्यता पाहाव्या लागतात. म्हणजे जिथे उतरणार त्या भागात अन्न भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे का? आणि तिथल्या रहिवासी पक्ष्यांबरोबरच्या स्पर्धेत आपण टिकाव धरू शकतो का? कारण स्थानिक जागांचे, अन्नसाठय़ाचे ज्ञान तिथल्या रहिवासी पक्ष्यांना जास्त असते, बरेच दिवस एकाच जागी राहिल्याने, बारकाईने सर्व निरीक्षण त्यांनी आधीच करून ठेवलेले असते व त्यामुळे त्यांचे जगणे बाहेरून येणाऱ्या पक्ष्यांच्या तुलनेत सोपे असते. अशा वेळी स्थलांतरित पक्ष्यांवर आगीतून उठून फुफाटय़ात अशी विपरीत अवस्था ओढवू शकते. अशा वेळी बाहेरून येणारे पक्षी हा भूभाग गाळून थेट पुढचा भूभाग गाठतात, जिथे अन्नसाठा भरपूर असेल आणि रहिवासी पक्ष्यांची स्पर्धाही कमी असेल.
स्थलांतर करणारा अगदी घरबसल्या सहज दृष्टीला पडणारा पाणपक्षी नसलेला पक्षी म्हणजे रानखाटीक(२ँ१्र‘ी), कारण हा झाडामध्ये लपलेला नसतो, तर विजेच्या दोन खांबांच्या मधल्या तारांवर स्वत:चे मोठे पांढरे पोट सांभाळत, मान एका बाजूला वळवून विजेच्या तारेखाली लांब शेपटी सोडून तोल सावरत अत्यंत बसक्या आवाजात चिरकत असतो. गवतावर उडणारे किडे, अळ्या, छोटय़ा पालीसुद्धा हा क्षणार्धात पकडतो आणि चोचीच्या हुकात अडकवून, आपटून त्यांना ठार मारतो. मग बाभळीच्या किंवा अशाच एखाद्या झाडाच्या काटय़ात टांगून ठेवतो. हे त्याचे अगदी आवडते काम. किडे मारून ते काटय़ाला टांगण्याचे काम तो एखाद्या खाटकाच्या कौशल्याने करतो, म्हणून त्याला ‘खाटीक’ असे म्हणतात. नंतर हा अन्नसाठा, कमतरता निर्माण होते तेव्हा वापरता येतो.मराठीत याला ‘गांधारी’ असे एक अगदी समर्पक नाव आहे. या बदामी रंगाच्या पक्ष्याच्या दोन्ही डोळ्यांपासून डोक्याच्या मागे जाणारी, डोळे बांधलेल्या गांधारीची आठवण करून देते. पण रानखाटीकची पट्टी डोळ्यावरून नसते. उलट त्याचे डोळे तीक्ष्ण असतात आणि त्याची चोच हूकसारखी असते.
असे हे लांब शेपटीचे रानखाटीक आपल्याकडे पाठ करून बसलेले असतात, तेव्हा त्याच्या पाठीचा रंग आणि याच्या पंखांवरील काळ्या पिसांमुळे बनलेला इंग्रजी ‘व्ही’ आकार आणि त्या ‘व्ही’चा ‘वाय’ करणारी लांब शेपटी, सारेच काही मनाचा ठाव घेणारे. रानखाटीकच्या बरोबरीनेच आपण वर्षभर ज्यांची वाट बघत असतो ते स्वर्गीय नर्तक किंवा धम्म पिवळ्या रंगाचा हळद्या मध्येच एखाद्या वर्षी आपल्या बागेत, आपल्या गावाला भेट देत नाहीत आणि आपण हळहळत राहतो. पण त्यांचे अन्न असणारी फळझाडे आपण लावली, वाढवली आणि आहेत ती तोडली नाहीत तर या अतिथी पक्ष्यांनाही पुरेसा खाऊ मिळेल आणि निसर्गाची जादू आणि त्यातले सळसळते चैतन्य आपल्या बागेत पाहायला मिळेल.

Story img Loader