कारंजा (लाड) तालुक्यातील कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘पक्षी बचाव रॅली’ काढून समाजाला पक्ष्यांवर प्रेम करा, असा अभिनव संदेश दिला. विदर्भाचे तापमान वाढत असून पक्षी आणि छोटय़ा प्राण्यांच्या जीवाला धोका आहे. जंगलातील पाण्याचे स्रोत आटले असल्याने पक्ष्यांच्या तृष्णा व क्षुधा तृप्तीचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पक्ष्यांवर प्रेम करा, हा अभिनव संदेश समाजाला देण्यासाठी कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘पक्षी बचाव रॅली’ काढली. यात विद्यार्थ्यांनी अनेक आकर्षक फलके हातात घेऊन गावातील आबालवृद्धांना या रॅलीत सहभागी करण्यासाठी पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरी पक्षी व प्राण्यांची पाणी पिण्याची सोय केली आहे. जिल्हा परिषद विद्यालयामध्येही अनेक ठिकाणी पाण्याची भांडी ठेवली असून या कार्यक्रमाचे प्रमुख शिक्षक गोपाल खाडे या कार्यासाठी सहकार्य करत आहेत. त्यांच्याबरोबर राष्ट्रीय हरित सेनेचे प्रा. वरघट, स्काऊट पथकाचे वसंतराव चव्हाण यात सहकार्य करत आहेत. २०० विद्यार्थ्यांना भांडी वाटण्यात आली असून कामरगावात सर्वत्र पक्ष्यांची पाणी पिण्याची सोय झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा