भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज शहरात सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गोपीनाथ मुंडे यांनी सकाळीच बाजार समिती चौकातील डॉ. आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
खासदार दिलीप गांधी, उपमहापौर गीतांजली काळे, तसेच मनीष साठे, श्रीकांत साठे आदी अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. त्यानंतर दिवसभर आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा ओघ वाढत होता. महापौर शीला शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, मनपा आयुक्त विजय कुलकर्णी, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अभियंता परिमल निकम आदींनी डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष, माजी महापौर संग्राम जगताप तसेच शहरातील अन्य राजकीय पक्ष, संस्था, संघटना यांचे कार्यकर्ते, पदाधिकारीही दिवसभर येत होते.
पुतळ्याभोवती नेहमीप्रमाणे भव्य शामियाना घालण्यात आला होता. परिसरात जत्रायात्रेचे वातावरण निर्माण झाले होते. आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्ते कुटुंबांतील मुलांबाळांसह येऊन डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेत होते. सायंकाळी ५ वाजता पुतळ्यापासून मिरवणूक सुरू झाली. मिरवणुकीत अर्थातच डी. जे. होते. त्याच्या तालावर कार्यकर्ते नाचत होते. रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती. मिरवणुकीला मोठा पोलीस बंदोबस्त होता.