वाढदिवसाचे औचित्य साधून दुष्काळग्रस्तांना मदत करण्याच्या प्रकारामध्ये जिल्ह्य़ामध्ये वाढ होत चालली आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १६० टन धान्य शुक्रवारी त्यांच्या कार्यकर्त्यांनी संकलित केले. याशिवाय ६ लाख वह्य़ा जिल्ह्य़ातील गरीब विद्यार्थ्यांना देण्यासाठी जमा झाल्या.
 मंत्री सतेज पाटील यांनी वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छ, पुष्पहार देण्याऐवजी धान्य व वह्य़ा द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला जिल्ह्य़ातील नागरिक तसेच मतदारसंघातील कार्यकर्त्यांकडून आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापारी वर्गानेही धान्य देऊन या उपक्रमास मदत केली.
दिवसभरात गहू, तांदूळ अशा स्वरूपातील १६० टन धान्य सायंकाळपर्यंत जमा झाले होते. त्याच्या पाच किलोच्या पिशव्या बनवून त्या दुष्काळग्रस्तांना वितरित केल्या जाणार आहेत. त्याच्या कामातही कार्यकर्ते सायंकाळनंतर व्यग्र झाले होते. प्रतिवर्षी मंत्री पाटील हे वाढदिवसाला वह्य़ांचा स्वीकार करतात. आजही या उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद देत ६ लाख वह्य़ा शुभेच्छा रूपाने त्यांच्याकडे सोपविल्या. जिल्हा परिषदेच्या शाळा, महापालिकेच्या शाळा येथील गरीब विद्यार्थ्यांना या वह्य़ांचे वाटप केले जाणार आहे.

Story img Loader