नेहमीची वाट चुकून जंगलातून पाण्याच्या शोधात नागरीवस्ती जवळ आलेल्या व अतिउत्साही नागरिकांमुळे बिथरलेल्या रानगव्यांचा कळप तीस तासांनंतर पूर्ववत जंगलाकडे निघाले आहेत. मात्र देवाळे, कांडगाव पंचक्रोशीत अद्यापही भीतिदायक वातावरण आहे. त्यामुळे शुक्रवारी शेतामध्ये दैनंदिन कामे करणारे बहुतांशी ग्रामस्थ शेतात गेले नाहीत.    
दरम्यान, काल धावपळीमुळे करवीर तालुक्यातील पी. डी. पाटील यांच्या शेतजमिनीलगतच्या विहिरीत पडून मृत झालेल्या गव्यावर वन खात्याने पंचनामा करून त्याच्या मृतदेहाचे शेतामध्येच दहन करण्यात आले. कोल्हापूर विभागीय वनक्षेत्रपाल सदानंद घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी मृत गव्याचा पंचनामा केला.    
या गव्यांचा कळप पूर्ववत परतीच्या वाटेवर असून, नागरिकांनी अफवेवर विश्वास न ठेवता आणि गवे पाहण्याच्या मोहास बळी पडून त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन जिल्हा वन खात्यातर्फे करण्यात आले आहे.    
चार दिवसांपूर्वीच याच गव्यांच्या कळपातील दोन गवे नजीक असलेल्या जैताळ गावातील कडय़ावरून पडून दरी परिसरात मृत झाल्याची व त्याकडे वन खात्याने दुर्लक्ष केल्याचीही चर्चा सर्वत्र होत आहे.