शहरातील वाढती गुन्हेगारी व बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या विरोधात शुक्रवारी भारतीय जनता पार्टीच्यावतीने शिवाजी चौकात भाजपाचे आमदार चंद्रकांतदादा पाटील व जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.    
खून, दरोडे, मारामाऱ्या, चोऱ्या आणि राजकीय वैमनस्यातून हत्या यामुळे संपूर्ण राज्यात कोल्हापूर बदनाम झाले आहे. पोलीस प्रशासन व राज्य सरकार केवळ बघ्याची भूमिका घेऊन गुन्हेगार पोसत आहे. या विचित्र आणि स्फोटक परिस्थितीमध्ये कोल्हापूर हे अशांत, असुरक्षित बनले आहे. यासाठी आज राज्य सरकारला व पोलीस यंत्रणेला जाग आणण्यासाठी धरणे आंदोलन छेडण्यात आले.    
धरणे आंदोलनात गृहमंत्री आर.आर.पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील व पोलीस प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी आमदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, कोल्हापूर हे सुसंस्कृत व सहकाराचे आश्रय होते. पण आज चोऱ्या, खून आणि मटका यामुळे कोल्हापूरची प्रतिमा मलीन झाल्याचे त्यांनी नमूद करून या सर्वाची जबाबदारी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी स्वीकारून त्यांनी ताबडतोब राजीनामे दिले पाहिजेत.    यावेळी जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी देखील कोल्हापूर शहरातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर कडाडून टिका केली व कोल्हापूर शहर हे किती असुरक्षित आहे, याचे दाखले दिले.     
या धरणे आंदोलनात भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष भिवटे, विजय जाधव, राहुल चिकोडे, गणेशदेसाई, युवा मोर्चाचे संदीप देसाई, नगरसेवक आर.डी.पाटील आदी उपस्थित होते.

Story img Loader