मराठवाडय़ातील दुष्काळाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत असून पाणी व चाऱ्याचा मोठा प्रश्न आहे. सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे. ७ एप्रिलपर्यंत चारा छावण्यांचे अनुदान चालकास द्यावे अन्यथा भारतीय जनता पक्षाचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे ८ एप्रिलपासून उपोषण करतील, असा इशारा पूर्वीच देण्यात आला होता. भाजप कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने   विभागीय आयुक्तांना तसे लिखित स्वरूपात गुरुवारी कळविले.
खासदार मुंडे यांच्या उपोषणामुळे निर्माण होणाऱ्या जनक्षोभास व कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीस पोलीस प्रशासनच जबाबदार असेल, असेही दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ग्रामीण भागाचे चित्र पालटून गेले असून जनावरांना चारा मिळेनासा झाला आहे. ज्यांनी छावण्या सुरू केल्या, त्या टिकतात की नाही असा संभ्रम तयार झाला आहे. कारण छावण्यांना अजूनही सरकारी अनुदान मिळालेले नाही. जालना जिल्ह्य़ातील बदनापूर तालुक्यातील भाकरवाडी येथे चारा छावण्यांचे अनुदान मिळालेले नाही. खासदार मुंडे यांनी या छावणीला भेट दिल्यानंतर शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अनुदान आले नसल्याचे सांगितले. चारा छावण्यांचे अनुदान तातडीने द्यावे, अशी विनंती विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली आहे.
७ एप्रिलपर्यंत उपाययोजना न झाल्यास उपोषण केले जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. शिष्टमंडळात माजी मंत्री हरिभाऊ बागडे, ग्रामीण भागाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, शहर जिल्हाध्यक्ष बापू घडामोडे, माजी महापौर डॉ. भागवत कराड, विजया रहाटकर यांची उपस्थिती होती.