आर्थिक दुर्बल घटक योजना पूर्ववत सुरू करावी, अन्यथा नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडी समर्थित विदर्भ जनता विचार मंचने केली आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या उदासीन धोरणाच्या विरोधात १२ डिसेंबरला विधानभवनावर मोर्चा काढण्याचा निर्धारही भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीने केला आहे.
माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात २० कलमी कार्यक्रमांतर्गत गरिबांना अत्यंत अल्पदरात भूखंड वाटप करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार आर्थिक दुर्बल घटक योजना राबविण्याचा निर्धार नागपूर सुधार प्रन्यासने केला होता. या योजनेचा शुभारंभ १९७६ मध्ये झाला. आशीर्वादनगर, दर्शन कॉलनी, हरपूर, सन्यालनगर, सम्यकनगर, महेंद्रनगर, यादवनगरात ६०० चौरस फुटांचे १७७१ भूखंड आर्थिक दुर्बल घटक योजनेतील लोकांना वाटप करण्यात आले. १९८० मध्ये ३२३१, १९८१-५४५९, १९८३-२१३०, १९८४-१९१५, १९८५-१२२९ आणि १९८७मध्ये ३४१३ भूखंडांचे वाटप करण्यात आले. मात्र यानंतर ही योजना बंद करून नागपूर सुधार प्रन्यासने गाळे वाटप योजना सुरू केली. या योजनेत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांचा विचार करण्यात आला नाही, असा आरोप भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीने केला आहे.  मोर्चाचे नेतृत्व भाजपचे शहर अध्यक्ष आमदार कृष्णा खोपडे व आमदार देवेंद्र फडणवीस करणार आहेत. मोर्चात आमदार विकास कुंभारे, आमदार सुधाकर देशमुख, श्रीकांत देशपांडे, मोबीन खान, राजेश बांगडी आदी सहभागी होणार आहेत.
पत्रकार परिषदेला भाजपच्या अल्पसंख्य आघाडीचे शहर अध्यक्ष अशफाक पटेल, महासचिव आणि विदर्भ जनता विचार मंचचे अध्यक्ष इब्राहीम खान उपस्थित होते.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा