राज्यात गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस आघाडीच्या कारभाराविषयी जशी जनसामान्यांमध्ये नाराजी होती, तशाच प्रकारची नाराजी ठाणे जिल्ह्य़ातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेत असणाऱ्या शिवसेनेविषयीसुद्धा होती. युती तुटल्याने भाजपच्या रूपाने एक चांगला पर्याय उपलब्ध झाल्याने एरवी सेनेसोबत असणाऱ्या शहरातील सुशिक्षित मतदारांनी यंदा भाजपला पसंती दिल्याचे दिसून आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्षांनुवर्षे एकहाती सत्ता देऊनही विकासाच्या नावाने बोंब असणाऱ्या जिल्ह्य़ातील शहरी भागातील मतदारांनी शिवसेनेला अद्दल घडविल्याचे चित्र रविवारी जाहीर झालेल्या निकालांमुळे दिसले.
  पालिकेच्या माध्यमातून जिल्ह्य़ातील स्थानिक सत्ताकारणावर वरचष्मा असणारी शिवसेना जनसामान्यांच्या प्रश्नांपासून दूर गेली. ‘ऐंशी टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ भूतकाळात जमा झाले. सेनेच्या माध्यमातून समाजकारणात कार्यरत असणारे कार्यकर्ते शाखेत येईनासे झाले. ‘शिवसेनेचे ठाणे’ हे खरे तर अभिमानगीत, पण त्याचे गर्वात रूपांतर झाले. अडीच वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीतच सेना-भाजप युतीला अगदी काठावरचे बहुमत देऊन मतदारांनी आपला कल व्यक्त केला होता. गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रूपाने एक चांगला पर्याय मतदारांपुढे होता. विशेषत: तरुणांना या पक्षाकडून खूप अपेक्षा होत्या. त्यामुळे सुशिक्षित तरुणाईने त्या वेळी मोठय़ा प्रमाणात मनसेचा झेंडा हाती घेतला होता. पुढील काळात मात्र मनसे तरुणाईचा हा विश्वास कायम राखू शकली नाही. लोकसभा निवडणुकीत तरुण मतदार भाजपच्या नमो लाटेवर स्वार झाला. युती असल्याने सेनेलाही त्याचा फायदा झाला. तेव्हाच खरे तर ठाण्यातील शहरांना ‘अच्छे दिन कधी येणार’ असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करीत होते. युती तुटल्याने स्वतंत्रपणे लढणाऱ्या भाजपला पसंती देऊन या शहरी भागातील नागरिकांनी सेनेला धडा शिकविल्याचे दिसून येते. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर यांसारख्या शहरांमध्ये वर्षांनुवर्षे शिवसेनेची सत्ता आहे. शहरांमधील ही स्थानिक सत्ता टिकविण्यासाठी एरवी मांडवली राजकारणात मश्गूल असलेल्या सेना नेत्यांनी या शहरांचा कोणता विकास केला, असा प्रश्न येथील मतदारांना सतावत होता. ठाण्यासारख्या शहरात ‘सॅटीस’सारख्या प्रकल्पापलीकडे सेनेची मजल जात नाही. स्थायी समितीत राजकारण करताना मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सगळ्या पक्षांना एकत्र घेत आपल्याच परंपरागत मतदारांना दुखविण्याचे काम स्थानिक नेते करू लागले आहेत. त्यामुळेच भाजपचा पर्याय समोर दिसताच मतदारांनी या सगळ्याचे उट्टे काढल्याचे चित्र दिसून आले.
यश भाजपचे, श्रेय संघाचे
शिवसनेच्या तुलनेत ठाणे जिल्ह्य़ात भाजपची संघटनात्मक ताकद अतिशय कमी आहे. पालिकांच्या सत्ताकारणातही त्यांचा वावर अतिशय मर्यादित आहे. तरीही स्वतंत्रपणे मिळविलेल्या यशात काही मातब्बर आयारामांबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनकौशल्याचा मोठा वाटा आहे. संघाचा वावर दिखाऊ प्रचारात कुठेही दिसला नसला तरी अंतर्गतपणे संघाच्या स्वयंसेवकांनी अतिशय शिस्तबद्धपणे काम करून भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा