लातूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती गुरुवारी (६ फेब्रुवारी) मराठवाडा विभागाचे प्रमुख आमदार विनोद तावडे  घेणार आहेत.
भाजपच्या उमेदवाराचा २००९ च्या निवडणुकीत अतिशय अल्पमताने पराभव झाला होता. या वर्षी मोदींनी वातावरण तापवल्यामुळे भाजपची उमेदवारी मिळणे म्हणजे खासदार होणे असा समज भाजपमधील इच्छुक उमेदवारांचा आहे. त्यामुळे इच्छुकांची तशी भाऊगर्दी आहे. बार्शी रस्त्यावरील हॉटेल ग्रँडमध्ये मुलाखती होतील. मागील निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार सुनील गायकवाड हे त्यांच्यावरील आरोपातून तावूनसुलाखून बाहेर पडल्याचे सांगत मुलाखतीसाठी उपस्थित राहणार आहेत. उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव, हेरचे माजी आमदार टी. पी. कांबळे, उस्मानाबादचे कैलास िशदे, लोहा मतदारसंघातील सुरेंद्र घोडजकर, नव्याने चच्रेत असलेले लातुरातील नेत्रतज्ज्ञ डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह सुमारे २५ जण उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. निलंग्यातील राजेश्वरी नितनवरे, पानगावच्या ललिता कांबळे या महिलांचाही यात समावेश आहे.
विनोद तावडे हे दिवसभर इच्छुकांच्या मुलाखती घेऊन सायंकाळी नांदेड येथे जाणार आहेत. लातूर लोकसभेसाठी घेतलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीचा अहवाल निवडणूक निर्णय समितीकडे सुपूर्द केला जाणार आहे. गेल्या वेळी काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपने आपला उमेदवार जाहीर केला होता. या वेळी भाजपची निवडणुकीची तयारी जोरदार सुरू असून, उमेदवार निवडीच्या प्रक्रियेसाठी भाजपने पहिले पाऊल टाकले आहे.
काँग्रेसच्या उमेदवारीसंबंधी घरचा व बाहेरचा असा तिढा निर्माण झाला आहे. अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी चार महिन्यांपूर्वीच आपल्याला उमेदवारी मिळणार असल्याचे घोषित केल्यामुळे त्यांच्या मार्गात अडसर निर्माण करण्यासाठी विद्यमान खासदार जयवंत आवळे यांनी पक्षप्रमुख स्थानिकांना प्राधान्य देणार असतील तर आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे पत्रक मागील महिन्यातच प्रसिद्धीस दिले होते. त्यामुळे डॉ. नरेंद्र जाधवांसाठी आवळेंनी नवा स्पीडब्रेकर उभा केला असल्याचे मानले जाते. स्थानिक इच्छुक उमेदवारांची काँग्रेसमध्ये मोठी संख्या असली तरी अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्यामुळे आपल्या उमेदवारीसंबंधी उघडपणे बोलण्यास स्थानिकची मंडळी तयार नाहीत.

Story img Loader