भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपद निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या पदासाठीचे एक इच्छुकअनिल गट्टाणी यांनी स्थानिक स्तरावर कोणत्या नेत्याशी संपर्क न साधता थेट प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनाच शहर भाजप संघटन-एक चिंतन अशा आशयाचे दीर्घ पत्र पाठवून त्यात शहरातील सुंदोपसुदींचे वर्णन केले आहे.
दरम्यान विद्यमान शहराध्यक्ष मिलिंद गंधे यांच्या अध्यक्षतेखाली शहर शाखेच्या निवडणुकीचे निरीक्षक प्रताप ढाकणे यांनी निवडणूकपुर्व बैठक पक्षाच्या कार्यालयात घेतली. त्यात त्यांनी शहरातील ६५ प्रभागांसाठी निरीक्षक नियुक्त केले. या निरीक्षकांनी प्रभागातील सक्रिय सदस्यांबरोबर चर्चा करून प्रभाग समिती स्थापन करायची आहे. ढाकणे यांनी त्यांना कामकाजाची तसेच निवडणूक आचारसंहितेची माहिती दिली. सर्व सदस्यांबरोबर चर्चा करून बहुमताने प्रभाग समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करावी अशी सुचना गंधे यांनी केली.
गट्टाणी यांनी प्रदेशाध्यांना लिहिलेल्या पत्रात पद अडवा व कार्यकर्ता जिरवा अशा पद्धतीने काम चालल्यामुळे पक्ष शहरात विकलांग झाला असल्याची तक्रार केली आहे. गटातटाचे शिक्कामोर्तब करून निष्ठावान कार्यकर्ता मोडीत काढला जात आहे. त्यामुळे बोलघेवडेपणा करणारा, विरोधकांची मनधरणी करणारा, स्वार्थासाठी कार्यकर्त्यांत भेद करणारा, कसलाही जनाधार नसलेला शहराध्यक्ष करू नये. पक्षाला उभारी देणाऱ्या, कार्यकर्त्यांना विश्वास देणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांची या पदावर निवड व्हावी यासाठी स्वत: या निवडणुकीत लक्ष घालावे असे गट्टाणी यांना मुनगंटीवार यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.