विरोधी पक्षनेते तथा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कार्यशैलीवर अतिशय कठोर शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रहार केल्यामुळे या पक्षाबरोबर नाशिक महापालिकेत सत्तासंगत करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अतिव दु:ख झाले असून त्यांनी मनसेच्या वर्षभरातील कामकाजाचा गोड शब्दात पंचनामा करत राज ठाकरे यांना अपेक्षित विकास साधण्याचा सल्ला दिला आहे.
राज यांच्या वक्तव्यावर दु:ख प्रगट करणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मात्र पालिकेत त्यांच्या पक्षाला पाठिंबा कायम ठेवायचा की नाही, याविषयी जसे सोईस्करपणे मौन बाळगले, तसेच आजवरच्या चुकीच्या कामांना शांत राहून कसा पाठिंबा दिला, हे देखील नकळतपणे दाखवून दिले.
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मनसे अध्यक्ष राज यांनी विरोधी पक्षनेत्यांवर टोलेबाजी केली होती. अधिवेशन काळात सकाळी जोरदार भाषण करणारे सायंकाळी ‘सेटींग’ करतात. ही मनसेची कार्यपद्धती नसून यंदाच्या अधिवेशनात मनसे आमदार विरोधक म्हणून आक्रमक भूमिका निभावणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया उमटत असून नाशिकमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेले दु:ख, हा त्याचाच भाग होय.
भाजपचे उपमहापौर सतीश कुलकर्णी व गटनेते संभाजी मोरूस्कर यांनी पत्रकार परिषदेत ही भावना व्यक्त करत मनसेने सोईसोईने घेतलेल्या निर्णयाची काही वानगीदाखल उदाहरणे मांडली. नाशिक महापालिकेत मनसेला सत्ता स्थापन करणे भाजपने पाठिंबा दिल्यामुळे शक्य झाले.
पालिकेतील निर्णय प्रक्रियेत अनेकदा मनसेने सोईस्करपणे निर्णय बदलविले. परंतु, मनाविरुद्ध निर्णय होऊन देखील युतीचा धर्म म्हणून आम्ही संयमाची भूमिका घेतली, अशी कबुलीही संबंधितांनी देऊन टाकली. बोलण्याच्या ओघात भाजपच्या शिलेदारांनी मनसेच्या कारभाराचा पाढा वाचला खरा, मात्र, नकळतपणे चुकीचे कामकाज होत असताना भाजपने मौन बाळगून कसे समर्थन केले, हे नकळतपणे दाखवून दिले. याबाबतचे एक लेखी पत्रच संबंधितांनी प्रसारमाध्यमांना दिले.
पालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुतेक सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी प्रभागनिहाय ठेका देण्याची मागणी केली होती. तथापि, मनसेच्या महापौरांनी परस्पर विभागनिहाय ठेका देण्याचा निर्णय घेत दोन वर्षांसाठी निविदाही प्रसिद्ध केली. शालेय विद्यार्थ्यांची गणवेश खरेदी निविदा काढून करण्याचे सूचविण्यात आले होते. परंतु, उपरोक्त ठरावात बदल करून मनसेने काळ्या यादीत असणाऱ्या ठेकेदाराकडे ते काम सोपविले, अशी तक्रारही भाजपचे उपमहापौर व गटनेते यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी मनसेने महापालिकेत केलेल्या कामाचे अवलोकन करावे आणि नाशिककरांचा अपेक्षित विकास साधण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सूचना केल्यास अधिक चांगले होईल, असा टोलाही लगावला आहे. राज यांच्या वक्तव्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची चांगलीच गोची झाली. कारण, पालिकेतील सत्ता तर टिकवायची आणि मनसेवर आडून का होईना शरसंधान साधायचे, असे त्यांचे गृहीतक असल्याचे दिसत होते. यामुळेच छापील निवेदन वगळता इतर प्रश्नांवर ते काही बोलले नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा