राजकीय पक्षांच्या चढाओढीत लोकांची फरफट होत असल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळते. पण मालाड, कांदिवली, बोरीवलीत सध्या काँग्रेस आणि भाजपमध्ये उद्याने नटवण्याची चढाओढ लागली असून एकानंतर एक उद्यानांचे सुशोभिकरण सुरू झाले आहे. लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सुरू असलेल्या या स्पर्धेत उजाड झालेल्या उद्यानांना बहर आल्याने मधल्या मध्ये नागरिकांना नव्याने नटलेल्या बागांमध्ये प्रसन्न वातावरणात मोकळा श्वास घेण्याची संधी मिळत आहे.
या उद्यानबाजीला कारण ठरले आहे ते गोपाळ शेट्टी यांच्या प्रतिमेचे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात शेट्टी यांची प्रतिमा ‘उद्याने आणि मैदाने वाचवणारे’ आमदार अशी आहे. स्वातंत्र्यवीरसावरकर उद्यान, पोयसर जिमखाना या शेट्टी यांनी विकसित केलेल्या काही उद्यानांबाबत वाद असले तरी शेट्टी यांनी येथील मैदानांसाठी व उद्यानांसाठी राखीव असलेले मोकळे भूखंड मोठय़ा प्रमाणात वाचविले, हे त्यांच्या विरोधकांनाही मान्य आहे. त्यामुळे, आगामी लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांच्या गळय़ात उमेदवारीची माळ पडली तर त्यांच्यादृष्टीने अत्यंत सकारात्मक ठरणारा हा मुद्दा ‘हायजॅक’ करण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहेत. याच डावपेचांचा भाग म्हणून या परिसरातील उद्याने आणि मैदानांच्या सुशोभिकरण व सौंदर्यीकरणावर काँग्रेसच्या नगरसेवक आणि आमदारांनी भर देण्यास सुरुवात केली आहे. अर्थात या उद्यानबाजीमुळे येथील रहिवाशी चांगलेच खूश आहेत. वर्षांनुवर्षे ओसाड पडलेल्या या उद्यानांवर वृद्धांना बसण्यासाठी बाके, मुलांना खेळण्यासाठी साहित्य, जॉगर्स ट्रॅक उपलब्ध झाल्याने त्यांची चांगलीच सोय झाली आहे.
उद्यानबाजी
आपल्या कार्यकाळात गोपाळ शेट्टी यांनी बोरीवली, दहिसर, कांदिवली परिसरातील अनेक मैदाने आणि उद्याने सुशोभित केली. त्यापैकी वीर सावरकर उद्यान, पोयसर जिमखाना, लिंक रोडचे झाशीची राणी उद्यान, दहिसरचे शिवाजी महाराज क्रिडांगण, कस्तुर पार्क उद्यान, चिकू वाडी उद्यान, वामनराव पै उद्यान, चारकोपचे बालाजी मनोरंजन उद्यान, बोरीवलीचे अश्विनी डिस्कव्हरी जॉगर्स पार्क, कंट्री पार्क जॉगर्स पार्क, योगी नगरचे पु. ल. देशपांडे उद्यान आदी काही उदाहरण देता येतील.
तर काँग्रेसचे गोराईचे नगरसेवक शिवानंद शेट्टी बाजार आणि उद्यान समितीवर आहेत. याचा फायदा घेत शेट्टी यांनी गोराईतील पेप्सी मैदान, गोराई स्मशानभूमीजवळील उजाड झालेल्या उद्यान आणि झूम प्लाझाच्या गल्लीतील उद्यान या तीन उद्यानांच्या सुशोभीकरणाला सुरूवात केली आहे. त्यांच्याप्रमाणे शीतल म्हात्रे (दहिसरचे पालिकेचे उद्यान), आमदार असलम शेख (मालवणीचे मैदान), रमेशसिंग ठाकूर (ठाकूर व्हिलेजमधील मैदाने-उद्याने) आदी नेत्यांनीही आपापल्या भागातील उद्यानांच्या व मैदानांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. खुद्द निरूपम यांनीही येथील उद्यानांच्या विकासासाठी आपला निधी देऊ केला आहे. त्यातून साईबाबा नगरमधील नाना-नानी पार्क, गोराई डेपोजवळील म्हाडाचा मोकळा भूखंड विकसित करण्याचे काम होत आहे.

शेट्टी विरूद्ध शेट्टी
गोराईतील एकमधील ‘झूम प्लाझा मॉल’च्या गल्लीत असलेल्या उद्यानात दोन वर्षांपूर्वी गोपाळ शेट्टी यांनी ‘जॉगिंग ट्रॅक’ आणि मुलांसाठी घसरगुंडी, दोन झोपाळे, सी-सॉ आणि मेरी गो राऊंड असे खेळाचे साहित्य बसवून दिले. त्यावेळी उद्यानाच्या प्रवेशद्वारावर गोपाळ शेट्टी यांचा फोटो असलेला हा फलक दिमाखात झळकत होता.
आता या उद्यानाताली मेरी गो राऊंड, घसरगुंडी आणि झोपाळे देखभालीअभावी तुटलेले आहेत. कुणाचेच लक्ष नसल्याने हे उद्यान टवाळांचे दारू पिण्याचे आणि सिगरेटी फुंकण्याचे अड्डे बनले आहेत. आता या उद्यानाचा कायापालट करण्यासाठी काँग्रेस सरसावली आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वारावर जिथे गोपाळ शेट्टी यांचा फलक झळकत होता तिथे आता काँग्रेसचे निरूपम, नगरसेवक शिवानंद शेट्टी आणि कार्यकर्त्यांची छायाचित्रे असलेला फलक झळकला आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील ‘उद्यानबाजी’चे राजकारण या छायाचित्रांमधून उलगडते.

Story img Loader