राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निवासस्थान असलेल्या मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेसमध्ये इच्छुकांची चांगलीच गर्दी असून त्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेला मतदारसंघ यावेळी शाबुत राहावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक कामाला लागले आहेत.
पुनर्रचनेत या मतदार संघात भाजपचे प्राबल्य असल्यामुळे माजी मंत्री अनिस अहमद यांनी गेल्या निवडणुकीत माघार घेत पश्चिम नागपुरातून निवडणूक लढवली होती आणि ते पराभूत झाले होते. मात्र यावेळी ते पुन्हा मध्य नागपुरात इच्छुक आहेत. भाजपने या मतदारसंघावर पकड मजबूत केल्यामुळे त्यांच्याकडे इच्छुकांची संख्या वाढली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत पुनर्रचनेत भाजपचे वर्चस्व असलेला भाग समाविष्ट करण्यात आला, त्यामुळे काँग्रेसची फारच अडचण झोली होती. मुस्लिम आणि हलबांची संख्या मोठय़ा प्रमाणात असली तरी ती काँग्रेसकडे आहे असे नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नितीन गडकरी यांना ९४ हजार १६२ तर काँग्रेसचे विलास मुत्तेमवार यांना ५४ हजार २१५ मते पडली होती. निवडणुकीची तयारी सुरू झाली असताना माजी मंत्री अनिस अहमद पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत.
या शिवाय पक्षाचे प्रदेश चिटणीस जयप्रकाश गुप्ता, शेख हुसेन, डॉ. राजू देवघरे, माजी आमदार शौकत कुरेशी, कमलेश समर्थ आदी नेते स्पर्धेत आहेत. या मतदारसंघात मोमीनपुरा या वस्तीचा समावेश असल्यामुळे अल्पसंख्यक समाजाच्या प्रतिनिधीला संधी मिळावी, अशी भूमिका काँग्रेसच्या काही नेत्यांनी घेतली आहे.
 सोमवारी झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात चांगलेच तोंडसुख घेतले. जवळच्या लोकांना उमेदवारी न देता जो निवडून येईल त्यांना उमेदवारी द्या, अशी घोषणा केली. मुस्लिम आणि हलबा समाजाचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघातून दोन्ही समाजातील अनेक इच्छुकांची विविध पक्षांकडे मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. रिपब्लिकन गटाप्रमाणे हलबामध्ये अनेक गट असून त्यातील अनेक नेते निवडणूक लढण्यासाठी समोर येत आहे.
भाजपतर्फे विकास कुंभारे पुन्हा उमेदवारी मिळविण्यासाठी कामाला लागले आहेत. हलबा समाजाचे प्राबल्य असल्यामुळे आणि गेल्या पाच वषार्ंत समाजासाठी केलेल्या विकास कामामुळे उमेदवारी मिळावी यासाठी उत्सुक असले तरी समाजातील काही लोकांचा त्यांना विरोध आहे. या शिवाय प्रवीण दटके, गिरीश व्यास, अर्चना डेहनकर यांची नावे इच्छुकांमध्ये आहेत. जातीय समीकरणामुळे या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये वर्चस्वाची लढाई होत असली तरी यावेळी वातावरण वेगळे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा