भारतरत्न इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असून सार्वजनिक स्वच्छता वाढली आहे. या प्रश्नावर पालिका प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही या समस्या कायम राहिल्याने वैतागलेल्या भाजपच्या स्थानिक नगरसेविका मंगला पाताळे यांनी मंगळवारी महापालिकेच्या परिमंडळ कार्यालयात गांधीगिरी मार्गाने आंदोलन करीत ठिय्या मारला आणि पदाचा राजीनामाही दिला. मात्र प्रशासनाने लगेचच प्रलंबित समस्यांची सोडवणूक करण्याची हमी देताच हे आंदोलन मागे घेण्यात आले.
पालिका परिमंडळ कार्यालयात जाऊन नगरसेविका पाताळे यांनी आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसह तेथील अधिका-यांना पुष्पहार घालून सत्कार केला व तेथेच ठिय्या आंदोलन केले. प्रशासन काम करीत नाही आणि त्याविरोधात केलेल्या आंदोलनाची दखलही घेत नसेल तर नागरिक यापेक्षा आणखी काय करणार, असा सवाल उपस्थित करीत नगरसेविका पाताळे यांनी हतबलता दर्शविली. नागरी समस्यांची सोडवणूक होत नसल्यामुळे आपणास नगरसेवकपदावर काम करण्यास स्वारस्य नाही, असे सांगत पाताळे यांनी नगरसेवकाचा राजीनामा परिमंडळ अधिका-याकडे सादर केला. या वेळी झालेल्या आंदोलनात पालिकाविरोधी पक्षनेते कृष्णाहरि दुस्सा यांच्यासह भाजपचे नगरसेवक जगदीश पाटील, पांडुरंग दिड्डी, शिवानंद पाटील आदींचा सहभाग होता. मात्र अखेर प्रशासनाने आंदोलकांना सामोरे जात उद्या बुधवारपासून नागरी समस्यांची सोडवणूक करण्याची हमी दिली तेव्हा आंदोलन मागे घेण्यात आले व पाताळे यांनीही नगरसेवकपदाचा राजीनामा परत घेतला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा