श्रीरामपूर शहर दहशतीखाली असून येथील दलित महिलेवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करावी, अशी मागणी भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा नीता केळकर यांनी केली.
श्रीमती केळकर यांनी शहरात येऊन या दलित महिलेची भेट घेतली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत केळकर बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, श्रीरामपूर शहरातील लोक प्रचंड दहशतीत आहेत. इतके की त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरूद्ध दाद मागण्यासाठी तक्रार दाखल करण्याचेही धाडस करू शकत नाही. गुंडांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. आरोपी चक्क गुंडगिरीचा राज्याभिषेक करतात, ही घटना म्हणजे अविश्वासनीय असून या प्रकरणाचा तपासी अधिकारी वेगळा व माहिती देणारा अधिकारी वेगळा, तसेच या गुंडांना राजकीय पाठबळ आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
राज्यभरातून महिलांवरील अन्यायाविरोधात आंदोलने सुरू असून लोकशाही पद्धतीने करावयाची सर्व आंदोलने करून झाली आहेत. परंतु हे सरकार इतके निर्लज्ज आहे की काहीच करायला तयार नाही अशी टीका त्यांनी केली. भंडारा येथील पीडितांना जशी मदत मिळाली तशी तातडीची मदत या महिलेसही मिळावी, अशी मागणी करत हा दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, त्याविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा केळकर यांनी दिला. गिता बेलदार, आशा विधाटे, सुरेखा विद्ये, छाया रजपूत, सविता तारडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, सुनिल मुथ्था आदी उपस्थित होते.
पाचपुते यांची भेट
पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनीही आज अत्याचारीत महिलेची भेट घेतली. गुन्हेगारांना लवकरच अटक करण्यात येईल, तसे आदेश देण्यात येतील असे पाचपुते यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या समवेत राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ मुरकुटे होते.
 

 

Story img Loader