भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी २० मार्चला निवडणूक होणार आहे. तत्पुर्वी १० मार्चपर्यंत जिल्ह्य़ातील सर्व तालुका मंडल अध्यक्षपदाच्या निवडणुका पुर्ण केल्या जाणार आहेत. पक्षाचे निवडणूक निरीक्षक अतुल सावे यांनी आज पत्रकारांना ही माहिती दिली. जिल्हाध्यक्षपदाबाबत एकमत न झाल्यास पक्षश्रेष्ठीही नियुक्ती करु शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजप पक्षांतर्गत संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, त्यासाठी सावे आज नगरमध्ये आले होते, त्यांच्या उपस्थितीत पक्षाची सरकारी विश्रामगृहावर बैठक झाली. त्यास जिल्हाध्यक्ष आ. राम शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे, सुनिल रामदासी, जगन्नाथ निंबाळकर, भानुदास बेरड, बाळासाहेब पोटघन आदी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
राहुरी, संगमनेर शहर, नगर तालुका, नेवासे, कोपरगाव शहर व ग्रामीण, पारनेर, श्रीरामपुर शहर व ग्रामीण, अकोले, पाथर्डी व श्रीगोंदे या १२ मंडलाच्या स्थानिय समित्यांची नियुक्ती व सक्रिय सभासद नोंदणी पुर्ण झाली असल्याने त्यांच्या निवडणुका ५ मार्चपर्यंत पुर्ण केल्या जातील. उर्वरित नगर शहर, शेवगाव, जामखेड, कर्जत, राहाता, संगमनेर ग्रामीण या ६ मंडलामध्ये काही त्रुटी राहील्या आहेत, नगर शहरात काही वार्ड समित्यांच्या नियुक्तया झालेल्या नाहीत, त्यामुळे तेथे १० मार्चपर्यंत निवडणुका होतील, असे सावे यांनी सांगितले.
निवडणुकीसंदर्भातील नगर शहरातील वाद मिटले आहेत, त्यासाठी उद्याच बैठक होईल, असे ढाकणे यांनी सांगितले.
‘लोढांना शुभेच्छा!’
पक्षाचे माजी शहराध्यक्ष वसंत लोढा यांनी मनसेमध्ये प्रवेश केला याकडे लक्ष वेधले असता, माजी जिल्हाध्यक्ष ढाकणे यांनी, त्यासाठी त्यांना आमच्या शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भगवानगडावरील दौऱ्यात गोपीनाथ मुंडे यांच्या घोषणा दिल्या गेल्या, याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना आ. शिंदे यांनी, मुंडे यांनी पुर्वीच युतीत मनसेचा समावेश व्हावा, असे जाहीर केले आहे, युती व मनसेतील अंतर दिवसेंदिवस कमी होत आहे, सन २०१४च्या निवडणुकीपर्यंत अंतर नाहिसे होऊन आमची भेट झालेली असेल, असे सांगितले. काल रात्री भिंगारमध्ये दगडफेक करुन राष्ट्रवादीने आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवले,असेही शिंदे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा