भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा वाद आता थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष मुनगंटीवार यांच्या दरबारात पोहोचला आहे. पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्हाध्यक्षपदासाठी भाजपतील अंतर्गत गटबाजीमुळे या पदावर कुणाचीही निवड होऊ शकली नाही. विद्यमान जिल्हाध्यक्ष विजय कोटेचा यांना दुसऱ्यांदा संधी देण्याबाबत एका गटाचा विरोध असल्यामुळे राजेंद्र डांगे यांचे नाव समोर आले, मात्र भाजपतील एका गटाला ते मान्य नसल्यामुळे त्यांनी उमरखेडचे माजी आमदार उत्तम इंगळे यांचे नाव समोर केले आहे. विजय कोटेचा, राजेंद्र डांगे व उत्तम इंगळे या तिन उमेदवारांपकी कोणत्याही एका उमेदवाराच्या नावावर एकमत होत नसल्यामुळे हे प्ररकण थेट राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांकडे गेले आहे.
उल्लेखनीय म्हणजे एकेकाळी भाजपचे खासदार असलेल्या या जिल्ह्य़ात भाजपची जोरदार घसरण सुरू झालेली असूनही पक्षाअंतर्गत गटबाजी मात्र कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे चित्र आहे. जिल्ह्य़ातील सात आमदारांपकी भाजपचा एकही आमदार नाही. नगर पालिकेतही भाजपने राष्ट्रवादीशी युती करून सत्ता मिळवली आहे.
जिल्हा परिषदेतही भाजपची स्थिती तोळामासाच आहे. असे असतांना पक्षसंघटन मजबूत करण्याचा विचार करण्याऐवजी गटबाजीचाच विचार जास्त होत आहे. त्यामुळे नितीन गडकरी, मुनगंटीवार, गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे इत्यादी भाजपचे नेते या जिल्ह्य़ाच्या राजकारणात पडू इच्छित नाहीत. ते सारे एकमेकांकडे अंगुली निर्देश करीत आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दिवाकर पांडे, मदन येरावार, उध्दव येरमे यांचे देखील आपापले गट आहेत. या गटबाजीमुळे संघटनात्मक निवडणुकांमध्ये खोडा निर्माण झाला आहे.
मिशन-२०१४ चे लक्ष्य गाठण्यासाठी पक्षसंघटना आपल्या ताब्यात असावी, असा प्रयत्न भाजपचा प्रत्येक नेता करीत आहे. त्यामुळे गटबाजी मोठय़ा प्रमाणवर उफाळून आली आहे. गंमत अशी की, जिल्ह्य़ातील गटबाजी करणाऱ्या प्रत्येक नेत्याला राष्ट्रीय आणि प्रदेश स्तरावरील नेत्यांचे वरदहस्त आहेत. जिल्ह्य़ात भाजपची १९ मंडळे आहेत. त्याच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षपदी नवा चेहरा मिळावा, अशी मागणी केली आहे. या पाश्र्वभूमीवर एक गट राजू डांगे यांच्या पाठीशी, तर दुसरा माजी आमदार उत्तम इंगळे यांच्या पाठीशी आहे. उत्तम इंगळे उमरखेडचे असून १९९५ मध्ये ते उमरखेड मतदार संघातून विधानसभेवर निवडून आले होते. उल्लेखनीय म्हणजे, त्यांनी पोलीस शिपायाची नोकरी सोडून राजकारणात उडी घेऊन थेट आमदार होण्याचा चमत्कार केला होता. ते अनुसूचित जाती प्रवर्गाचे असूनही त्यावेळी उमरखेड या खुल्या प्रवर्गातून ते निवडून आले होते. नंतरच्या निवडणुकीत मात्र त्यांना पराभव पहावा लागला.
आता उमरखेड हा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला असून येथून लढण्याची उत्तम इंगळे यांची तीव्र इच्छा असल्याने भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी नको, अशी त्यांची भूमिका आहे, मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचे उजवे हात असलेले माजी आमदार मदन येरावार यांनी उत्तम इंगळे यांना जिल्हाध्यक्षपदावर आरूढ करण्यासाठी इंगळे यांना पाठिंबा दिल्याचे समजते. या सर्व पाश्र्वभूमीवर भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक पक्षश्रेष्ठींसाठी डोकेदुखीचा विषय झाला आहे, एवढे मात्र खरे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा