ठाणे महापालिकेतील भाजप नगरसेविका चांदणी दुलानी यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासंबंधी उच्च न्यायालय तसेच निवडणूक विभागाने कोणताही निर्णय दिलेला नसतानाही महापालिका प्रशासनाने त्यांचे पद रद्द केल्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे या प्रकरणी महापालिका आयुक्तांविरोधात न्यायालयात दावा दाखल करणार असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष संदीप लेले यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच या प्रकरणामागे काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.
ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्र. ५१ मधून भाजपच्या तिकीटावर चांदणी दुलानी या निवडून आल्या. मात्र, प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार अरुणा भुजबळ यांनी दुलानी यांच्या जात प्रमाणपत्राला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दरम्यान, न्यायालयाने त्यांचे जात प्रमाणपत्र पुन्हा पडताळणीसाठी कोकण विभागाकडे पाठविले होते. कोकण विभागीय समितीने पुन्हा पडताळणी करून दुलानी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविले होते. मात्र, याच समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र आधी वैध ठरविले होते. त्यामुळे या समितीविरोधातही न्यायालयात दावा दाखल केला आहे, असेही संदीप लेले यांनी सांगितले.
कोकण विभाग समितीने जात प्रमाणपत्र अवैध ठरविले असून त्यांचे नगरसेवक पद रद्द केलेले नाही. तसेच या समितीला नगरसेवक पद रद्द करण्याचा अधिकार नाही. या संदर्भात उच्च न्यायालय तसेच निवडणूक विभाग निर्णय घेऊ शकते. मात्र, अद्यापही त्यांच्याकडून यासंबंधी निर्णय आलेला नाही. असे असतानाही महापालिका सचिवांनी दुलानी यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याचे पत्र दिले आहे.
त्यामुळे महापालिका आयुक्तांविरोधात न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या नगरसेविका रझिया शेख यांचे देखील जात प्रमाणपत्र रद्द ठरविण्यात आले आहे. मात्र, शेख आणि दुलानी यांना वेगवेगळा न्याय दिला जात असून या मागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. महापालिकेत ६५-६५ असे समान संख्याबळ असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीकडून अशा प्रकारचे राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Story img Loader