दिग्गज म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री काँग्रेसचे सतीश चतुर्वेदी यांचा ४३ हजार २१४ मतांनी पराभव करून सुधाकर कोहळे यांनी दक्षिण नागपूर मतदारसंघावर भाजपचा झेंडा रोवला. आपलाच उमेदवार विजयी होणार, या आत्मविश्वासाने मतमोजणी केंद्रावर पोहोचलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर मात्र तिसऱ्याच फेरीनंतर पुरता हिरमोड झाल्याचे पाहावयास मिळाले.
पहिल्याच फेरीत भाजपचे कोहळे यांनी ५ हजार १५८ तर काँग्रेसचे चतुर्वेदी यांनी २ हजार ६३० मते घेतली. केवळ पाचव्या फेरीत चतुर्वेदी यांना ३ हजार २६ मते मिळाली. कोहळे यांनी पहिल्या फेरीत घेतलेली आघाडी दोन फेऱ्यांचा अपवाद वगळता कायम ठेवली. पहिली फेरी जाहीर होताच भाजपच्या कार्यकर्त्यांचे चेहरे खुलले. पुढच्या फेरीत स्थिती चांगली होईल, असा होरा बांधलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तिसऱ्या-चवथ्या फेरीनंतर केंद्र सोडणे पसंत केले. प्रत्येक फेरी संपल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचे चेहरे अधिकच खुलत होते. सतरावी फेरी संपली नि भाजप कार्यकर्त्यांनी ‘भारत माता की जय’ घोषणा देत विजयश्रीच्या भावनेला वाट मोकळी करून दिली. इतर चारही प्रमुख पक्षांचे उमेदवार मतमोजणी केंद्राकडे फिरकले नाहीत. शेवटची फेरी जाहीर झाल्यानंतर बऱ्याच उशिरा सुधाकर कोहळे तेथे आले. तेव्हा मात्र डॉ. छोटू भोयर, रमेश सिंगारे, सतीश होले, गजु तांबोळी, प्रा. मधु घाटे, चंदू आखतकर आदींसह भाजप कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला.
सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. काटेकोरपणे सुरू असलेली मतमोजणीची सोळावी फेरी ठीक एक वाजता संपली. फेरीची स्थिती जाहीर करण्यास विलंब होत होता. मतमोजणी केंद्रात पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला. परिसरात एका मांडवात पत्रकारांसाठी व्यवस्था करण्यात आली होती. प्रसिद्धी खात्याचा कर्मचारी तेथे येऊन प्रत्येक फेरीची स्थिती जाहीर करीत होता. दूरचित्रवाणी संच असल्याने तेथे पोलीस व इतर कर्मचाऱ्यांचीही गर्दी होती. भाजपचे सुधाकर कोहळे यांना अंतिमत: ८१ हजार २२४, काँग्रेसचे सतीश चतुर्वेदी यांना ३८ हजार १०, बसपच्या सत्यभामा लोखंडे २३ हजार १५६, अपक्ष व शिवसेनेचे बंडखोर शेखर सावरबांधे १५ हजार १०७, शिवसेनेचे किरण पांडव १३ हजार ८६३, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दीनानाथ पडोळे यांना ४ हजार १९४ मते मिळाली.
दरम्यान, दक्षिण नागपूरचा विकास हे आपले मुख्य ध्येय राहणार असून लेआऊट्सचे अनेक प्रश्न असल्याने त्यांना आरक्षण मुक्त करेल, असे नवनिर्वाचित आमदार सुधाकर कोहळे यांनी सांगितले. दक्षिण नागपुरात अॅडव्हेंचर पार्क करण्याचा मानस आहे. मतदारांनी तसेच नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी दाखविलेला विश्वास सार्थकी लावेल, असे ते म्हणाले. सहपोलीस आयुक्त अनुपकुमारसिंह, उपायुक्त इशु सिंधू, सहायक पोलीस आयुक्त तुकाराम गौड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला.
एकूण मते १ लाख ८३ हजार २६१
पोस्टल मते १ हजार १११ (नोटा ७, बाद मते १०)
वैध पोस्टल मते १ हजार ९४
एकूण नोटा १ हजार २७६
वैध मते १ लाख ८१ हजार ९७७