विदर्भात फक्त शहरी भागापुरताच मर्यादित असलेल्या भाजपला ग्रामीण भागात पोहोचविण्यारे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त एकही प्रमुख कार्यक्रम आयोजित न करण्यात आल्याने विदर्भातील भाजप नेते मुंडे यांना विसरले असल्याची खंत त्यांचे समर्थक दबक्या आवाजात व्यक्त करीत आहेत.
विदर्भात नागपुरात संघ मुख्यालय असताना भाजपचा प्रसार हा मोजक्याच चौकटीत होता. ही चौकट मोडून हा पक्ष सर्वधर्मीय होण्यासाठी ज्या भाजप नेत्यांनी प्रयत्न केले त्यात विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचेही योगदान आहे. ९० च्या दशकात आणि त्यानंतर महाजन असेपर्यंत राज्यात मुंडे-महाजन यांचाच बोलबाला असल्याने सहाजिकच कार्यकर्त्यांचा कल मुंडे यांच्याच बाजून राहात असे. मुंडे यांनीही वेगवेगळ्या प्रचार यात्रांच्या माध्यमातून विदर्भ पिंजून काढून गावागावातील कार्यकर्ते पक्षासोबत जोडले होते. त्यामुळे भाजपची शक्ती या प्रदेशात वाढली. नागपूरही त्याला अपवाद नव्हते. मुंडे यांच्या राजकीय कारकीर्दीला वळण देणाऱ्या अनेक घडामोडी नागपुरात घडल्या. त्यामुळे त्यांना चाहतावर्ग मोठय़ा प्रमाणात येथे आहे. त्यापैकी काही नेते सध्या पक्षात आहेत. काही अडगळीत गेले. काहींनी परिस्थितीशी जुळवून घेतले, तर काहींनी पक्ष सोडला. मात्र, मुंडे यांच्याप्रती त्यांची सहानुभूती कायम आहे.
मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर जसे पक्षातील कार्यकर्ते हळहळले होते, तसेच त्यांचे इतर पक्षातील चाहतेही दु:खी झाले होते. या पाश्र्वभूमीवर ३ जूनला मुंडे यांचा पहिला स्मृती दिन झाला. या दिवशी पक्षाच्या शहर कार्यालयात फक्त श्रद्धांजली कार्यक्रम झाला. त्याला एकही मोठा नेता उपस्थित नव्हता. या कार्यक्रमाचा अपवाद वगळता दुसऱ्या कोणताही कार्यक्रम नागपूरमध्ये झाला नाही. त्यामुळे विदर्भातील भाजपचे नेते आणि कार्यकर्ते मुंडे यांना विसरले का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंडे असेपर्यंत पक्षात गडकरी विरुद्ध मुंडे गट, असा संघर्ष होता. महाजन यांचा मृत्यू झाल्यावर पक्षाने आपल्याला अडगळीत टाकल्याची भावना मुंडे यांच्या मनात निर्माण झाल्यावर जेव्हा जेव्हा त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला तेव्हा तेव्हा विदर्भातील अनेक भाजप नेते त्यांच्या पाठिशी उभे राहत असत. आता मुंडे नाही. त्यांचे कट्टर समर्थक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत.
मुंडे यांच्या पहिल्या स्मृतीदिनी ते पंकजा मुंडे यांनी आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. नागपूरमध्ये मात्र त्या पातळीवर कुठलाही कार्यक्रम झाला नाही, याची मुंडे समर्थकाना हळहळ वाटते. मात्र, अधिकृतपणे याबाबत कोणीही बोलायला तयार नाही.
त्यांचे स्थान कार्यकर्त्यांच्या मनात : नेत्यांची पुण्यतिथी, जयंती साजरी करण्याची प्रथा किंवा परंपरा पक्षात नाही. जे काही कार्यक्रम होतात ते कार्यकर्ते स्वंयस्फूर्तीने करतात आणि तसे कार्यक्रम मुंडे यांच्या स्मृतीदिनी नागपूरमध्ये, विदर्भातही झाले आहेत. मुंडे पक्षाचे लोकनेते होते. त्यांचे स्थान कार्यकर्त्यांच्या व नेत्यांच्याही मनात आहेत. मोदींचा जन्मदिन साजरा करण्याचेही आदेश पक्षाने कधी काढले नाहीत, पण कार्यकर्त्यांनी कार्यक्रम घेतले. उगाचच मुंडे यांच्या स्मृतीदिनावरून वाद निर्माण करणे चुकीचे आहे. याउलट, मुंडे यांची स्मृती चिरकाल स्मरणात राहावी म्हणून आम्ही रचनात्मक कार्यक्रम हाती घेण्याच्या विचारात आहोत.
भाजप प्रवक्ते- गिरीश व्यास